वसंत ठकार आणि अनुराधा करकरे यांना नृपो पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:02+5:302021-09-03T04:12:02+5:30
पुणे : नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंट्स ऑर्गनायझेशन (नृपो) संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सावली आश्रमाचे संचालक वसंत ठकार आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात ...
पुणे : नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंट्स ऑर्गनायझेशन (नृपो) संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सावली आश्रमाचे संचालक वसंत ठकार आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सेंटर फॉर एक्शन, रिसर्च अँड एज्युकेशन (केअर) संस्थेच्या संस्थापिका अनुराधा करकरे यांना न्यायमूर्ती ना. ल. अभ्यंकर नृपो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नृपोचे अध्यक्ष सुरेश कांगो आणि उपाध्यक्ष सुरेश नातू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्याधर देशपांडे आणि नीलिमा बापट यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
सत्काराला उत्तर देताना वसंत ठकार म्हणाले, समाजात काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु तुमच्या कामातील सातत्य पाहून तोच समाज तुमच्या पाठीशी देखील उभा राहतो. ज्येष्ठत्व आणि मतिमंद मुलांच्या क्षेत्रात काम करताना पाशात्त्य देशांच्या तुलनेत आपण बरीच वर्षे पिछाडीवर आहोत, हे अधोरेखित करावसे वाटते. २०१७ मध्ये आलेल्या सीएसआर कायद्यामुळे अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. ज्येष्ठत्व आणि मतिमंद यो दोन्ही क्षेत्रात अजूनही प्रबोधनाची गरज आहे. या दोन्ही घटकांचा होणाऱ्या भावनिक कोंडमाऱ्याला आपण सहानभूतीपूर्वक वाट करून दिली पाहिजे.
सुरेश नातू यांनी संस्थेची कार्यशैली उलगडली तर सुरेश कांगो यांनी प्रास्ताविक केले. नृपोचे सचिव सुभाष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर, अशोक देशपांडे यांनी आभार मानले. वीणा कुलकर्णी यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.