वसतिगृहाच्या जाचक अटींविराेधात एनएसयुआयचे आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:04 PM2019-08-01T16:04:00+5:302019-08-01T16:05:39+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात प्रवेशासाठी घालण्यात आलेल्या जाचक नियमांच्या विराेधात एनएसयुआयच्या वतीने आंदाेलन करण्यात आले.
पुणे : वसतिगृहात राहायचे असेल तर कुठलिही राजकीय भूमिका घ्यायची नाही, तसेच सरकारविराेधी काही करायचे नाही असा अजब नियम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तयार करण्यात आला आहे. या नियमाच्या विराेधात आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून एनएसयुआयच्या वतीने बुधवारी विद्यापीठात आंदाेलन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांनी कुठलिही राजकीय भूमिका घेऊ नये तसेच सरकार, शासनविरोधी कृत्य करू नये असे म्हंटले आहे. तसेच राष्ट्र-विरोधी,समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यापूर्वी सही करुन घेण्यात येणार आहे. या विराेधात आता विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे.
विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनपासून कुलगुरुंच्या कार्यालयापर्यंत एनएसयुआयने माेर्चा काढला. यावेळी विविध घाेषणा देत या नवीन नियमाचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जाचक नियम रद्द करण्याची मागणी केली. यावेळी प्र. कुलगुरु डाॅ. एन. एस उमराणी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा करुन यावर निर्णय घेऊ असे आश्वासन आंदाेलक विद्यार्थ्यांना दिले.
या आंदाेलनात एनएसयुआयचे राष्ट्रीय महासचिव अंकित देडा, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, विद्यापीठ अध्यक्ष सतीश पवार, महासचिव अभिजित हळदेकरस रुक्साना पाटील शेख सहभागी झाले हाेते.