चार वर्षाच्या परिश्रमानंतर तयार केली 'न्युक्लियर बॅटरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 08:03 PM2019-12-04T20:03:21+5:302019-12-04T20:04:54+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षाच्या परिश्रमानंतर ‘न्युक्लियर बॅटरी’ तयार केली आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षाच्या परिश्रमानंतर ‘न्युक्लियर बॅटरी’ तयार केली आहे. पेस मेकर,सेंसर,पाणबुडी किंवा सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनच्या (इस्त्रो)विविध अवकाश मोहिमांसाठी सुध्दा ही बॅटरी उपयोगात आणता येणार आहे.
इस्त्रोकडून देण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.संजय ढोले ,डॉ.वसंत भोरसकर व संशोधक विद्यार्थी आंबादास पटागरे यांनी ही बॅटरी तयार केली आहे. इस्त्रोकडून न्युक्लियर बॅटरी तयार करण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळाले आहे. बॅटरी तयार करण्यासाठी प्रामुख्याने टिटॅनियम आॅक्साईड व सिलिकॉन कार्बाईड या सुक्ष्म पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. बॅटरीमध्ये न्युक्लिअर रेडिएशनच्या बिटा कणांचा किरनोत्सारी ट्रिशिअम स्त्रोत वापरण्यात आला आहे. या बिटा कणांची उर्जा 18 किलो इलेक्ट्रॉन होल्ट एवढी असून त्याची शक्ती 10 क्युरी आहे.क्युरी हे किरणोत्सारी मोजण्याचे एकक आहे. या बॅटरीमध्ये ट्रिशियम बिटा सोर्स आर्धायन (हाफ लाईफ)बारावर्षे असल्यामुळे बॅटरीचे आयुष्य 30 ते 35 वर्ष झाले आहे.
डॉ.संजय ढोले म्हणाले, इस्त्रोने विद्यापीठाकडे न्यूक्लिअर बॅटरी तयार करण्याचे काम सोपविले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यावर अभ्यास सुरू होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, विभाग प्रमुख डॉ.सुरेश गोसावी यांच्या पाठिंब्यामुळे प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना न्यूक्लिअर बॅटरी तयार करण्यात यश आले. विद्यापीठाने इस्त्रोसाठी ही बॅटरी तयार केली आहे. पेस मेकर, सेंसर, पाणबुडी यांच्यासह ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश पोहचू शकत नाही,अशा विविध प्रकारच्या सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो.
बॅटरीची कार्यक्षमता ही बिटास्त्रोतांच्या क्षमतेच्या व्यस्थ प्रमाणात असल्याने शक्तीशाली न्युक्लिअर बॅटरी तयार करण्यास मर्यादा आहेत. परंतु, कमी शक्तीशाली बॅटरी तयार करणे या तंत्रामुळे शक्य झाले आहे,असे नमूद करून ढोले म्हणाले,बॅटरी तयार करण्याच्या संशोधनासाठी डॉ.शैलेंद्र दहिवले,डॉ.भूषण पाटील,डॉ.प्रमोद काळे यांचे सहकार्य लाभले.