पाबळ रस्त्यावर माती, अपघातांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:56+5:302021-05-17T04:08:56+5:30
राजगुरुनगर : पाबळ रस्ता ते होलेवाडी दरम्यान, गॅसलाईनच्या कामासाठी खोदाईचे काम सुरू होते. मात्र, ते पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने ...
राजगुरुनगर : पाबळ रस्ता ते होलेवाडी दरम्यान, गॅसलाईनच्या कामासाठी खोदाईचे काम सुरू होते. मात्र, ते पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने रस्ता पुन्हा व्यवस्थित केला नाही. त्यामुळे या रस्त्यावर मुरुममिश्रित माती आल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांधकाम विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष होत असून रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
राजगुरुनगर शहरानजीक पाबळ रोड ते होलेवाडी रस्त्यादरम्यान रस्त्यालगत गॅसलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यालगत यंत्राद्वारे
खोदकाम करण्यात येत आहे. गॅस पाईप गाडून झाल्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा खोदलेल्या रस्त्याची व्यवस्थितरीत्या दुरुस्ती करण्यात येत नाही. पर्यायाने खोदकामात निघालेली मुरूममिश्रित माती रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना याचा फटका बसत आहे. गेल्या चार दिवसांत ८ ते १० दुचाकीस्वार या रस्त्यावर घसरून पडून त्यातील अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
सध्या कोरोनाकाळ व लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे ठेकेदाराने गॅसवाहिनीसाठी खोदाई सुरू केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने या ठिकाणी विविध कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. तसेच कंपनी कामगारांच्या बसेस, कंपन्यात दुचाकीवर ये-जा करणारे कामगार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यालगत खोदाईचे काम असल्याने ठेकदाराने खोदाई केलेल्या जागेभोवती सुरक्षा म्हणून बॅरिकेड लावणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही.
खोदाई केलेली माती व मुरूमाचे ढिगारे रस्त्यावरच टाकण्यात येतात. तसेच पाऊस पडल्यावर या मातीमिश्रित मुरूमाचा गाळ होऊन रस्त्यावर येतो. रस्ता निसरडा बनतो. वाहनचालकांना धोकादायकरीत्या वाहने न्यावी लागत आहे. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. नवीन येणाऱ्या वाहनचालकास या रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोदाईमुळे रस्त्यांचीही वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
१६ राजगुरुनगर
पाबळ रोड ते होलेवाडी रस्त्यावर गॅसलाईनची खोदाई चालू असून रस्त्यावरच मातीचे ढिगारे टाकल्यामुळे अपघात होत आहे.