सक्रिय रुग्ण ३८ दिवसांत ४८ हजारांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:03+5:302021-05-27T04:11:03+5:30

दिलासादायक : कोरोनाचा संसर्ग कमी होतोय प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहरात कोरोना ...

The number of active patients decreased by 48,000 in 38 days | सक्रिय रुग्ण ३८ दिवसांत ४८ हजारांनी घटले

सक्रिय रुग्ण ३८ दिवसांत ४८ हजारांनी घटले

Next

दिलासादायक : कोरोनाचा संसर्ग कमी होतोय

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळाला. १८ एप्रिल रोजी शहरात या वर्षातील सर्वाधिक ५६६३६ सक्रिय रुग्ण होते. ८ एप्रिल रोजी ७०१० एवढी सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली. मे महिन्याचा शेवटचा आठवडा मात्र दिलासादायक ठरत आहे. २६ मे रोजी शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८३५६ इतकी नोंदवली गेली. गेल्या ३८ दिवसांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या तब्बल ४८,२८० ने कमी झाली आहे. याचाच अर्थ कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने कमी होत आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आणि दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर इतर राज्यांमध्ये संसर्गाचा वेग वाढला. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून पुणे हे देशातील ''हॉटस्पॉट'' ठरले होते. दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले शहर म्हणून पुण्याची नोंद झाली. गेल्या आठवड्याभरातील आकडेवारी मात्र पुणेकरांसाठी दिलासादायक ठरत आहे. पहिल्या लाटेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या निष्काळजीपणाची पुनरावृत्ती दुसऱ्या लाटेनंतर येऊ नये, अन्यथा आपणच तिसरी लाट ओढवून घेऊ, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

पुणे शहरात २०२१ या वर्षात सर्वांत कमी सक्रिय रुग्ण ७ फेब्रुवारी रोजी नोंदवले गेले होते. ती संख्या १३८३ इतकी होती. सक्रिय रुग्णसंख्येच्या दृष्टीने फेब्रुवारीचा पहिला आठवडा अत्यंत दिलासादायक ठरला होता. २० फेब्रुवारीनंतर मात्र रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्ण हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. या वर्षी २५ जानेवारी रोजी ९८ इतकी सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. त्या दिवशी सक्रिय रुग्णसंख्या २०२५ इतकी होती. एप्रिल महिन्यातील उद्रेकानंतर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णालयातून घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली. मे महिन्यात ही संख्या ४५०० इतकी होती.

------

दिनांक सक्रिय रुग्ण घरी गेलेले रुग्ण

२६ मे ८३५६ ११५८

१९ मे १५२३२ २४०७

१२ मे २७०१४ ४५६७

५ मे ३९७३२ ३३०३

२८ एप्रिल ४४०५९ ४९३६

२१ एप्रिल ५१९२० ६५३०

१४ एप्रिल ५३३२६ ४८९५

७ एप्रिल ४६०७१ ४३६१

३१ मार्च ३३८५८ ३३७४

२४ मार्च २६५१५ १४१०

------

२०२१ मधील :

सर्वात कमी रुग्णसंख्या - ९८ (२५ जानेवारी)

सर्वाधिक रुग्णसंख्या - ७०१० (८ एप्रिल)

सर्वात कमी सक्रिय रुग्ण - १३८३ (७ फेब्रुवारी)

सर्वाधिक सक्रिय रुग्ण - ५६६३६ (१८ एप्रिल)

Web Title: The number of active patients decreased by 48,000 in 38 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.