उपाययोजना आणि जनजागृतीमुळे घटली एड्स रुग्णांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:07 PM2019-05-25T19:07:04+5:302019-05-25T19:07:25+5:30
लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी एड्सचा संसर्ग रोखणे हे यंत्रणांसमोरील आव्हान आहे.
पुणे : पालिका आणि शासन स्तरावर केली जाणारी जनजागृती, नागरिकांमधील वाढती जागरुकता आणि उपाययोजना यामुळे एड्स रुग्णांची संख्या घटल्याचे सकारात्मक चित्र मागील दोन-तीन वर्षांपासून दिसू लागले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी त्याचा संसर्ग रोखणे हे यंत्रणांसमोरील आव्हान आहे. त्यासाठी वैद्यकीय उपाययोजनांसोबतच समुपदेशनावरही भर देण्यात येत असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी सांगितले.
पालिकेकडून गेल्या वर्षीपासून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही माहिती मागविली जात आहे. त्यामुळे एड्स विषयक कामामध्ये व्यापकता आली आहे. पालिकेकडून शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह स्त्री व पुरुषांच्या हॉस्टेल्सवर जाऊन समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाते. यासोबतच वेश्यावस्तीतील महिलांसाठी प्रबोधनपर शिबिरे आणि मेळावे घेतले जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत सुरक्षित शरीरसंबंधांबाबत माहिती दिली जात आहे. बॅनर्स आणि पोस्टर्स लावूनही जागृती वाढविली जात आहे. गणेशोत्सव आणि वारीमध्ये जनजागृतीवर भर दिला जातो.
यासोबतच पथनाट्य, रेडिओद्वारे लोकांमध्ये एड्सविषयी जागरुकता आणण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर्स आणि समुपदेशक बांधकाम कामगारांसह ट्रक आणि बसचालकांचेही प्रबोधन करीत आहेत. नुकताच मेट्रोच्या कामगारांसाठीही मेळावा घेण्यात आला. एड्सबाबत ज्या वर्गामध्ये अज्ञान आहे किंवा अपुरी माहिती आहे अशा वर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मुळातच नागरिकांमध्ये टेलिव्हिजन, रेडीओ, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयाबद्दल जागरुकता आलेली आहे. सुरक्षित शरीरसंबंधांकडे अधिक कल आहे. कंडोमसारख्या साधनांचा वापरही वाढलेला आहे. नागरिकांकडून घेण्यात येत असलेल्या काळजीचा परिणाम रुग्ण संख्या घटण्यामध्ये झाला आहे.
====
महापालिकेकडून शहरातील अकरा तपासणी केंद्रांवर एड्सबाबतची तपासणी केली जाते. आजाराचे निदान झाल्यानंतर मोफत उपचार सुरु केले जातात. औंध कुटी रुग्णालय, पाषाण कुटी रुग्णालय, बोपोडी, हडपसर, अंंबिल ओढा, होमीभाभा, मुंढवा, कमला नेहरु, मालती काची, गुरुवार पेठ, वानवडी, नायडू, राजमाता जिजाऊ, काशीनाथ धनकवडे या रुग्णालयांमध्ये फॅसिलिटी इंटीग्रेटेड काऊंन्सिलिंग अँड टेस्टींग सेंटर्स चालविले जातात. या केंद्रांमध्ये एचआयव्हीची प्राथमिक तपासणी केली जाते. त्यानंतर तर दळवी रुग्णालय, येरवडा रुग्णालय, भवानी पेठ रुग्णालय, कोंढवा आणि कोथरुड रुग्णालयात आयसीटीसी केंद्रामध्ये दुसºया टप्प्यातील तपासणी करुन आजाराबाबतचे निदान केले जाते. निदान झाल्यास येरवडा रुग्णालयात अँटी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रामध्ये प्रत्यक्ष उपचारांना सुरुवात केली जाते.
====
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जाणारी जनजागृती, मेळावे, समुपदेशन आणि उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहे. यासोबतच नागरिकांमध्येही एड्सबाबत जागरुकता वाढली आहे. सुरक्षित शरीरसंबंध या विषयावर उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. विविध सामाजिक संस्थाही या विषयात चांगले काम करीत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम रुग्णांची संख्या कमी होण्यामध्ये दिसू लागला आहे.
- डॉ. सुर्यकांत देवकर, प्र. सहायक आरोग्य अधिकारी
====
वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष संशयित रुग्ण एचआयव्ही रक्त तपासणी बाधित रुग्ण
२०१२ ८९, ६४५ ८६, ५८० २, ८०८
२०१३ १, १९, १९६ १, १६, २९८ २, ८८७
२०१४ ९९, ४०५ ९३, ६४७ २, २०३
२०१५ -- -- २, १५५
२०१६ ९३, ३१६ ८७, ९२३ १, ८२८
२०१७ ८९, ६०१ ८२, ७७३ १, ४३१
२०१८ ९८, ६०१ ९१, ३१८ १, ७०६
२०१९ ३२, ३१२ (एप्रिलपर्यंत) ३०, ७४२ ६४५