बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:57+5:302021-05-28T04:08:57+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जात असल्यामुळे निकालात ८५ ते ९० ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जात असल्यामुळे निकालात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. निकाल वाढल्यामुळे बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे येत्या जून-जुलैमध्ये घेतल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सध्या द्वितीय सत्राच्या परीक्षेची तयारी केले जात आहे. त्यासाठी प्राध्यापकांकडून प्रश्नसंच मागविण्यात आले आहेत. परीक्षा विभागाकडे प्राप्त झालेल्या काही प्रश्नसंचांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
विद्यापीठातर्फे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परीक्षेचा निकालही वाढला आहे. ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सुमारे ४० ते ४५ टक्के विद्यार्थी काही विषयांत अनुत्तीर्ण होत होते. मात्र, ऑनलाइन परीक्षांमध्ये केवळ १० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होत आहेत. ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.
------------
ऑनलाइन परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे यंदा बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. द्वितीय सत्राच्या अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर बहुतांश परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहेत.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ