पुणेकरांनो वेळीच सावरा! जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:30 PM2021-06-23T21:30:12+5:302021-06-23T21:31:30+5:30
महापालिका आणि नगरपालिका हद्दीत वाढताहेत रुग्ण
पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा सातत्याने १००० चा आकडा पार करायला सुरुवात केली आहे. अनलॉक नंतर वाढणारी ही आकडेवारी काळजीचं कारण मानली जात आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने रुग्ण संख्या कमी होत होती.त्यानंतर पुणे शहरात अनेक निर्बंध हटवले गेले होते. ग्रामीण भागात मात्र रुग्ण संख्या कमी होत नव्हती.त्यामुळे तिथे बंधने कायम ठेवण्यात आली होती. पण अनलॉक नंतर काही दिवस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या तसेच पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरुवात झाली आहे.
सोमवारी ६३६ वर असलेली संख्या मंगळवारी १११५ वर गेली होती.यात पुणे महापालिका हद्दीत २२०, पिंपरी चिंचवड मध्ये १९४, नगरपालिका हद्दीत ९८, कॅन्टोन्मेंट हद्दीत १८ तर ग्रामीण भागात ५८५ रुग्ण होते. आज बुधवारी पुणे महापालिका हद्दीत २८३, पिंपरी चिंचवड मध्ये २४१, नगरपालिका हद्दीत १११, कॅन्टोन्मेंट मध्ये ९ तर ग्रामीण भागातील ५५५ रुग्णांचा समावेश आहे.
पूर्वीचा तुलनेत हा दिलासा असला तरी देखील एकुण ही संख्या वाढणे हे देखील धोक्याचे लक्षण मानले जात आहे.त्यामुळे आता नियमांचे पालन करणे किती अत्यावश्यक आहे तेच यावरून दिसत आहे.तेव्हा पुणेकरांनो सावरा आणि कोरोना ची तिसरी लाट येऊ नये यासाठी वेळीच प्रयत्न करा असेच प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत.