कोरोनाबाधितांची संख्या घटली, पण रुग्णालयांवरील ताण कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:18+5:302021-05-27T04:12:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असली, तरी सरकारीसह खासगी रुग्णालयांवरील कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा भार ...

The number of coronaviruses decreased, but the stress on hospitals did not decrease | कोरोनाबाधितांची संख्या घटली, पण रुग्णालयांवरील ताण कमी होईना

कोरोनाबाधितांची संख्या घटली, पण रुग्णालयांवरील ताण कमी होईना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असली, तरी सरकारीसह खासगी रुग्णालयांवरील कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा भार अद्यापही कायम आहे़ आजमितीला शहरात दिवसाला केवळ सहाशे-सातशे नवे रुग्ण आढळून येत असतानाही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह आसपासच्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची उपचारासाठी पुणे शहराकडेच धाव आहे़ परिणामी शहरातील रुग्णालयांवरील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराचा ताण आणखी काही महिने तरी कमी होणार नसल्याचे दिसून येत आहे़

सद्य:स्थितीला शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ४० ते ५० टक्के रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत़ यामध्ये बहुतांशी रुग्ण हे गंभीर झाल्यावरच पुण्यातील रुग्णालयात दाखल होत असून, यामुळे शहरातील रुग्णसंख्येचा आकडा कमी होऊनही रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर बेड सहजासहजी उपलब्ध होत नाहीत़

महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शिवाजीनगर येथील एकट्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या ३४९ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत़ यापैकी १५१ रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत़ यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ८५ रुग्ण आहेत़ तर, आत्तापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एकूण २ हजार ८४० रुग्णांपैकी पर जिल्ह्यातील ५०३ रुग्ण होते़ तर, ग्रामीण भागातील २९४ व पिंपरी-चिंचवड येथील ११९ रुग्ण दाखल झाले होते़

जम्बो हॉस्पिटलप्रमाणे हीच परिस्थिती ससून सर्वोपचार रुग्णालयात देखील आहे़ येथेही शहरातील रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील, तसेच इतर जिल्ह्यातील अधिक आहेत़ ससूनमध्ये बहुतांशी रुग्ण हे गंभीर झाल्यावरच दाखल होत असल्याने येथील उपचारादरम्यानचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे़ आजही शहरात एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये २५ ते ३० टक्के मृत्यू हे पुणे शहराबाहेरील रुग्णांचेच असून, यामध्ये ससूनमधील मृत्यूचा आकडा अधिक आहे़

शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही पुण्याबाहेरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ त्यामुळे आजही खासगी रुग्णालयांमधील आयसीयू, व्हेंटिलेटर बेड ९० टक्के भरलेले आहेत़

--

चौकट

८२५ व्हेंटिलेटर बेडपैकी केवळ ८२ रिक्त

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड-१९ डॅशबोर्डवरील माहितीनुसार शहरातील १८८ रुग्णालयांमध्ये (सीसीसी वगळून) एकूण १० हजार २७७ बेड क्षमता आहे़ यापैकी बुधवारी रात्री आठपर्यंत यापैकी ६ हजार ८५२ ऑक्सिजन बेडपैकी ३ हजार ५२४ बेड रिक्त होते़ तर ६४५ आयसीयू बेडपैकी १७६ बेड रिक्त असून, शहरात आजमितीला ८२५ व्हेंटिलेटर बेड असताना देखील केवळ ८२ व्हेटिंलेटर बेड शिल्लक आहेत़

------------------------

खासगी ट्रॅव्हल्स व एसटी स्थानकांवर स्क्रिनिंग

पुणे शहराबाहेरून तथा इतर जिल्ह्यातून कामानिमित्त शहरात खासगी ट्रॅव्हल्स व एसटी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे शहरातील खासगी ट्रॅव्हल्स थांब्याच्या ठिकाणी, तसेच सर्व एसटी स्थानकांवर प्रवाशांच्या कोरोना तपासणीसाठी स्क्रिनिंगची यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले़

----------------------

Web Title: The number of coronaviruses decreased, but the stress on hospitals did not decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.