चारचाकीची संख्या वाढली अन् ड्रायव्हिंग स्कूलचा 'टॉप' गियर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:27+5:302021-07-26T04:10:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनानंतर अनेकजण सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनानंतर अनेकजण सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरात चारचाकीच्या संख्येत वाढ होत आहे. चारचाकीची संख्या वाढल्याने मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडे प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. चारचाकीचे प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचा 'टॉप' गियर पडला आहे.
कोरोनाच्या काळात मोटार ड्रायव्हिंग स्कुलला देखील मोठा फटका बसला. पुण्यात जवळपास ४३५ मोटार ड्राव्हिंग स्कुल आहेत. यापैकी सद्यस्थितीत २३५ स्कुलचे काम सुरु आहे. उर्वरित बंद झाल्याची शक्यता आहे. आता पुन्हा ड्रायव्हिंग स्कुलला चांगले दिवस आले आहे. पुण्यात वाढलेल्या चारचाकीचे प्रमाण हे त्यास कारणीभूत आहे. २० - २१ वर्षात केवळ पुणे आरटीओकडे जवळपास ५१ हजार चारचाकीची नोंद झाली आहे. त्याच्या मागील वर्षी ४७ हजार वाहनांची नोंद झाली होती. वर्ष संपण्यास आणखी बराच काळ शिल्लक आहे. त्यामुळे संख्येत आणखी वाढ होणार हे निश्चित.
बॉक्स १
चारचाकीचा कोटा वाढवावा ;
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात आली . त्यावेळी आरटीओ कार्यालयाने वाहन परवाण्याचा कोटा कमी केला . चारचाकी वाहन परवण्याचा कोटा पूर्वी रोज ७०० इतका होता .तो आता ३५० इतका करण्यात आला . आता प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने तो कोटा देखील पूर्ववत धरण्यात यावा अशी मागणी ड्रायव्हिंग स्कुल चालकांकडून होत आहे .
कोट १
ड्रायव्हिंग स्कुल कडे प्रशिक्षण घेणाऱ्याच्या संख्येत जवळपास १५ टक्यांनी वाढ झाली आहे . महिन्याकाठी जवळपास १ हजार प्रशिक्षणार्थीना अधिकृत पणे प्रशिक्षण दिले जात आहे . प्रशिक्षण घेतांना संबंधित स्कुल ही अधिकृत आहे याची खातरजमा करावी .
एकनाथ ढोले, अध्यक्ष, पुणे शहर व जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन
कोट २
चारचाकीचे प्रमाण वाढल्याचा परिणाम आमच्या देखील व्यवसायावर झाला आहे . प्रशिक्षण घेणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे . आम्ही चालकाला प्रशिक्षण देताना कोविड नियमांचे पालन करतो.
राजू घाटोळे , अध्यक्ष , महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन