‘जेईई’ उत्तीर्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:46 AM2018-06-11T02:46:00+5:302018-06-11T02:46:00+5:30
देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर करण्यात आला.
पुणे - देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर करण्यात आला. देशभरातून परीक्षा दिलेल्या दीड लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ १८ हजार १४८ विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णांचे प्रमाण खूपच घटले आहे. पुण्याचा अनुज श्रीवास्तव याला देशात २५ वा, तर अर्जुन काशेट्टीवार ३३ वा आला आहे.
हरियानाच्या प्रणव गोयलने ३६० पैकी ३३७ गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख पहिली आली आहे. तिला ३६० पैकी ३१८ गुण मिळाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर आता १५ जूनपासून जागावाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जेईई मेन्स परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांमधून देशभरातून १ लाख ५५ हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला पात्र ठरले होते. यामध्ये पुण्यातील १२०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. आयआयटी कानपूरच्यावतीने २० मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली.
मागील वर्षी ३५ टक्के मिळवून ५० हजार विद्यार्थी आयआयटी अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यंदा केवळ १८ हजार १४८ विद्यार्थ्यांनाच ३५ टक्के गुण मिळविता आले आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची काठिण्यपातळी अधिक असल्याने त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. देशभरात ३३ आयआयटी असून तिथे प्रवेशाच्या ११ हजार २७१ जागा उपलब्ध आहेत. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीबरोबरच इंडियन स्पेस इन्स्टिट्यूट येथेही प्रवेश मिळू शकतो, तसेच आयसरमध्ये प्रवेशासाठी ते अर्ज करू शकतात.
परीक्षेचे स्वरूप बदलल्याने काठिण्यपातळी वाढली
गेल्या ५८ वर्षांत पहिल्यांदाच आयआयटीची परीक्षा आॅनलाईन घेतली गेली होती. प्रश्नपत्रिकेतील ४० टक्के प्रश्न हे न्यूमरिकल व्हॅल्यू प्रश्न या नवीन पॅटर्नवर आधारित होते. मागील वर्षीपर्यंत घेण्यात येत असलेल्या इंटिजर पद्धतीच्या प्रश्नांपेक्षा या न्यूमरिकल व्हॅल्यू प्रश्न पद्धतीमध्ये २५ पट अचूकपणा गरजेचा होता. या कारणास्तव २०१७ च्या तुलनेत विशिष्ट रँकसाठी लागणाºया गुणांमध्ये १२ टक्के घसरण झाली आहे.
- दुर्वेश मंगेशकर,
जेईई परीक्षांचे मार्गदर्शक