खासगी रुग्णालयांमध्ये वाढले गर्भपाताचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2015 03:26 AM2015-12-16T03:26:08+5:302015-12-16T03:26:08+5:30
गर्भलिंग चाचणीबाबत कडक धोरण असताना देखील बारामतीसारख्या विकसित शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्याची आकडेवारी वाढत आहे.
बारामती : गर्भलिंग चाचणीबाबत कडक धोरण असताना देखील बारामतीसारख्या विकसित शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्याची आकडेवारी वाढत आहे. गर्भपातासाठी भले मोठे ‘पॅकेज’ घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
कठोर कायदे करून देखील मुलगाच हवा यासाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केले जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये देखील मागील ५ वर्षांत गर्भपाताची आकडेवारी वाढलेली असतानाच बारामतीसारख्या प्रगत शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अनेक पटींनी गर्भपात केले जात असल्याची नोंद आहे. २०११-१२ ते २०१४-१५ या काळात सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात ४५७ गर्भपात करण्यात आले. तर या वर्षात आजअखेर ९१ गर्भपात केल्याची नोंद आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे.
विशेषत: गर्भलिंग चाचणीवर बंदी असताना देखील शेजारच्या जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग तपासणी केली जाते. अनेक गर्भवती महिला त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी करतात. शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात गर्भपात केले जात असल्यामुळे सर्वाधिक गर्भपात स्त्री गर्भाचेच होत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी सांगितले, की शहरात ३४ सोनोग्राफी केंद्रे आहेत. शासकीय परवानगी असलेली २७ गर्भपात केंदे्र आहेत. सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगीमध्ये अधिक गर्भपात होत असल्याची नोंद आहे. आम्ही सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करणार आहे. (प्रतिनिधी)
गुजरात, सातारा, नगरमध्ये जाऊन गर्भपात
गर्भलिंग निदान करण्यासाठी गुजरात राज्यासह सातारा, नगर आदी भागात जाणाऱ्या मंडळींचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: लिंग निदानानंतर स्त्रीभ्रूण असल्यास गर्भपात केला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या भागांमध्ये जाऊन लोक छुप्या पद्धतीने पैसे आकारून लिंगनिदान करतात व मुलगी असल्याचे समजल्यास गर्भपात घडवून आणतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.