अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक- राजेश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:26 PM2018-08-24T23:26:36+5:302018-08-24T23:26:57+5:30

देशातील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अवयवदान नाही

The number of misconceptions about organism - Rajesh Shetty | अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक- राजेश शेट्टी

अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक- राजेश शेट्टी

Next

तीन वर्षांपूर्वी अवयवदानाविषयी पाच मिनिटांचा माहितीपट तयार केला होता. त्या निर्मितीप्रक्रियेदरम्यान आपल्याकडे अद्यापही अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणावर कामाची गरज असल्याचे निदर्शनास आले. रिबर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून आता अवयवदान करण्यासाठी प्रचार-प्रसाराकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून नुकतीच त्याची सुरुवात कर्नाटकातील मंगळूर येथून करण्यात आली. सायकल रॅलीतून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. याविषयी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांच्याशी साधलेला संवाद.

भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. अद्यापही देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश असे आहेत, की ज्यात अवयवदानविषयक जनजागृती नाही. दरवेळी शासनाला दोष देण्यापेक्षा आपण स्वत:हून आवश्यक ते बदल आत्मसात करण्याविषयी जागरुकता दाखविली पाहिजे.
खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवयवदानविषयक मोठ्या प्रमाणात सजगता पाहावयास मिळते. देशातील एकूण अवयवदानाच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात विरोधाभास असल्याचे दिसते. प्रचार अवयवदानाचा या माध्यमातून लोकमानस घडवून त्याचे परिवर्तन अवयवदानात कसे करता येईल, याचा विचार करण्याचे काम फाऊंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत. पुण्यात मागील तीन वर्षांपासून २०० जणांकडून अवयवदान झाले. या आकडेवारीवरून नजर फिरवल्यास आपल्याला अवयवदान व जनजागृती याची कल्पना येईल. मंगळूर येथे नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन, मंगळूर आणि असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यात अनुक्रमे ७५, ५३ आणि १०५ किमी अंतर सायकलिंग करण्यात आली.
या सर्वांमागील उद्देश हाच, की अवयवदानचा प्रचार आणि प्रसार. अवयवदानाविषयी महाराष्ट्रातील काही जिल्हयांचा अभ्यास केला असता त्यात रत्नागिरी, अहमदनगर या जिल्हयांमध्ये एकही परवानाधारक अवयवदानाचे रुग्णालय नाही. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रबांधणीच्या मोठ्या गप्पा आपण करीत असलो तरीदेखील प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे मोठी अवघड गोष्ट आहे. याकरिता गरज आहे ती जनमानसाचे वैचारिक प्रबोधन करण्याची. याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातही अवयवदानाचा परवाना नाही. या तुलनेत नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अवयवदानाची जागृती झालेली दिसते. आता सोलापूर, कोल्हापूरमध्ये अवयवदान होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध असताना दुसºया बाजूला अद्यापही अवयवदानाविषयी फारशी माहिती नसल्याचे चित्र दिसून येते. या वास्तवाचा स्वीकार करून आगामी काळात भरीव कामगिरी कशी करता येईल, याचा विचार सर्वांना करावा लागेल. यासाठी केवळ अवयवदानाशी संबंधित संस्था किंवा संघटनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्थेला महाराष्ट्र आरोग्य विभागाने आपला हेल्पलाईन क्रमांक दिला. त्या माध्यमातून संस्थेचा उत्साह वाढून अवयवदानाविषयी काम करण्याचे मनोबल वाढण्यास मदत झाली. सोशल माध्यमांचा उपयोग याकामी करता येऊ लागला. यूट्यूबवर अवयवदानाविषयीची माहिती अपलोड करून सबंध जगभरात पोहोचता येत आहे. अवयवदान ही चळवळ व्हावी याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न झाल्यास त्याचा उपयोग सर्वांनाच होईल. अवयवदानाबाबत जगातील इतर प्रगत देशांची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला आणखी मोठी मजल मारायची आहे, याची कल्पना येईल.

Web Title: The number of misconceptions about organism - Rajesh Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.