Pune Corona News: नव्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे; सक्रिय रुग्णसंख्येतही होतीये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 21:10 IST2021-11-17T21:10:01+5:302021-11-17T21:10:37+5:30
दिवसभरात ५ हजार १७६ जणांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: नव्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे; सक्रिय रुग्णसंख्येतही होतीये वाढ
पुणे : दिवाळीनंतर शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसाआड शंभरीच्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी १७ नोव्हेंबरला १०६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २.४ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात ५ हजार १७६ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ८४३ इतकी आहे. दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत शहरात ९ हजार ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १०० गंभीर रूग्णांवर तर ६७ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ६९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख २९ हजार ५५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ५ हजार ६१३ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ६८२जण कोरोनामुक्त झाले आहेत.