आॅनलाइन वाचकांची संख्या वाढली - अपर्णा राजेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:32 AM2017-10-16T02:32:40+5:302017-10-16T02:32:51+5:30
सत्तरच्या दशकातील वाचकांच्या संख्येचा विचार करता सध्या ग्रंथालयात येऊन वाचन करणा-या वाचकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे. त्यामुळे ग्रंथालयात येऊन वाचन करणा-यांची संख्या कमी झाली असली तरी
सत्तरच्या दशकातील वाचकांच्या संख्येचा विचार करता सध्या ग्रंथालयात येऊन वाचन करणा-या वाचकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे. त्यामुळे ग्रंथालयात येऊन वाचन करणा-यांची संख्या कमी झाली असली तरी आॅनलाइन वाचन करणाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाचकांची संख्या कमी झाली नसून दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, असे जयकर ग्रंथालयाच्या प्रभारी संचालिका अपर्णा राजेंद्र यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर एका वर्षानंतरच जयकर ग्रंथालय सुरू करण्यात आले. सुमारे साठ वर्षांपासून जयकर ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना आवश्यक असणारी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत, असे नमूद करून राजेंद्र म्हणाल्या, की जयकरमध्ये ३ लाखांहून अधिक पुस्तके आहेत. नियतकालिकांच्या बांधीव खंडांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. तसेच विद्यापीठातर्फे २0१२ पासून ५ हजारांहून अधिक आॅनलाइन पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून अनेक पुस्तकांचे जतन केले आहे. त्यामुळे वाचकांना अनेक दुर्मिळ पुस्तके जयकरमधून मिळतात.
राजेंद्र म्हणाल्या, की केवळ विद्यार्थी व प्राध्यापकच नाही तर ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान तसेच आनंद यादव, रावसाहेब कसबे यांच्यासह अनेक लेखकांनी जयकर ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेतला आहे. संशोधकांना तसेच अभ्यासकांना ७ दिवसांसाठी जयकरमध्ये बसून पुस्तकांचे वाचन करता येते. तसेच समाजातील काही मान्यवर व्यक्तींना एकाचे सदस्यत्व दिले जाते. विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाºयांकडूनही जयकरमधील पुस्तकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील संशोधक जयकरमध्ये बसून संशोधन ग्रंथ वाचून आवश्यक आपले संशोधन पूर्ण करतात. विद्यापीठातील ५00 हून अधिक पीएच.डी. व एम.फिल.चे विद्यार्थी जयकरमध्ये येतात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाच्या वतीने लेखक राजन खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यापीठातील विविध विभागांत शिक्षण घेणारे विद्यार्थी जयकर ग्रंथालयातून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसह कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, आत्मकथन आदी पुस्तके घेतात, असे नमूद करून राजेंद्र म्हणाल्या, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांच्यासह मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांना आजही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पुस्तकांच्या प्रती कमी पडल्या तर त्यात वाढ करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.
जयकर ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या एकावेळी ६00 विद्यार्थी या कक्षात बसून वाचन करू शकतात. ही संख्या पुढील काही महिन्यात ८00 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे.
जयकरमध्ये पुस्तकांबरोबरच दुर्मिळ गाण्यांचे रसग्रहण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे स्पष्ट करून राजेंद्र म्हणाल्या, की विद्यापीठ प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे जयकर ग्रंथालयात ‘संगीत लायब्ररी’ सुरू केली जात आहे. एका वेळी १५ व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, रवींद्र संगीत रसिकांना मेजवानी
मिळणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांधील प्राध्यापकांना जयकर ग्रंथालयात विनाशुल्क पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. जयकर ग्रंथालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी व संशोधकांना आवश्यक संदर्भग्रंथ व विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.