चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:49 PM2020-06-29T12:49:01+5:302020-06-29T12:51:36+5:30
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे...
पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत केवळ दहाच दिवसांत पाच हजार रुग्णांची भर पडली आहे. कोरोना चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाणही मागील आठवड्याच्या तुलनेत सुमारे दीड टक्क्यांनी वाढले आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होताना दिसत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
शहरातील बहुतेक बाजारपेठा, खासगी-शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे रस्ते, दुकानांसह कार्यालयांमधील गर्दीही वाढू लागली आहे. परिणामी, कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील आठवडाभर दररोत ३ हजारांहून अधिक नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळणाºया रुग्णांचे प्रमाण जवळपास १८ टक्के आहे. त्यामुळे चाचण्या वाढण्याबरोबरच त्यातुलनेत रुग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. मागील दहा दिवसांतच दररोज ५०० च्या सरासरीने तब्बल ५ हजार रुग्ण वाढले आहेत. शनिवारी (दि. २७) तर एकाच दिवशी ८२२ रुग्ण आढळून आले. शहरात रुग्णसंख्येचा पहिला पाच हजारांचा टप्पा गाठण्यासाठी ७७ दिवस लागले होते. त्यानंतरचा पाच हजाराचा टप्पा २२ दिवसांत तर आता केवळ १० दिवसांत ओलांडला आहे.
---------
चाचण्यांच्या तुलनेत रुग्णही वाढले
शहरात दि. १७ ते २६ जून या कालावधीत एकुण २७ हजार ८४९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४९५९ म्हणजे १७.८० टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर दि. ७ ते १६ जून या कालावधीत एकुण १७ हजार ७५१ चाचण्यांपैकी २ हजार ९२१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण १६.४५ टक्के एवढे आहे. याचा अर्थ चाचण्यांमधील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
कालावधी चाचण्या रुग्ण टक्केवारी
दि. १७ ते २७ जून २७,८४९ ४,९५९ १७.८०
दि. ७ ते १७ जून १७,७५१ २,९२१ १६.४५
------------------
दुपटीचा कालावधी झाला कमी
शहरात दि. ६ जून रोजी एकुण ७ हजार ७२२ रुग्णसंख्या होती. हा आकडा जवळपास दुप्पट होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला. त्यानुसार दि. २७ जून रोजी हा आकडा १५,६०२ वर पोहोचला. तर मागील आठवड्यातील दि. २० जून रोजीची ११,८५४ रुग्णसंख्या होण्यासाठी २३ दिवस लागले. दि. २८ मे रोजी ५ हजार ८५१ एवढी रुग्णसंख्या होती. यावरून मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोन दिवसांनी कमी झाल्याचे दिसते.
दिवस रुग्णसंख्या
दि. २७ जून १५,६०२
दि. ६ जून ७,७२२
दि. २० जून ११,८५४
दि. २८ मे ५,८५१
-----------------
रुग्णवाढीचे टप्पे
दिवस रुग्ण कालावधी
दि. ९ मार्च २
दि. २५ मे ५१८१ ७७ दिवस
दि. १६ जून १०,१८३ २२ दिवस
दि. २७ जून १५,६०२ १० दिवस
----------------------------------