अतिदक्षता विभागातील रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:24+5:302021-09-05T04:16:24+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तीन महिन्यांपूर्वी सर्व रुग्णालये तुडुंब भरली होती. खाट ...
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तीन महिन्यांपूर्वी सर्व रुग्णालये तुडुंब भरली होती. खाट मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होत होती. मात्र, दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णालयातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत व्हेंटिलेटरवर ३ टक्के रुग्ण, तर ऑक्सिजन खाटांवर केवळ ११.४ टक्के रुग्ण आहेत. रुग्ण नसल्याने काही तालुक्यांतील कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाढलेल्या रुग्णामुळे दवाखान्यात व्हेटिंलेटर्स आणि ऑक्सिजन खाटांची संख्या कमी होती. यामुळे रुग्णांना बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांवर भटकंती करण्याची वेळ आली होती. यामुळे पुन्हा जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. जून महिन्यानंतर रुग्णांची संख्या पुन्हा कमी होऊ लागली. सद्य:स्थितीत पुणे महानगरपालिकेत एकूण २ हजार ३६३ क्रियाशील रुग्ण आहेत. त्यातील १ हजार ५१४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ऑक्सिजनविरहीत खाटांवर ४५८ रुग्ण आहेत. तर ऑक्सिजन खाटांवर २२८ रुग्ण आहेत. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची संख्या मे महिन्यात सर्वाधिक होती. ती घटून आता केवळ ५० रुग्णांवर आली आहे. अतिदक्षता विभागात व्हेटिंलेटरवर सध्या केवळ ११३ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत १ हजार ३६१ क्रियाशील रुग्ण आहेत. त्यातील ७६८ रुग्ण गृहविलगीकरणात, २५१ ऑक्सिजन विरहीत खाटांवर, १८९ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर, अतिदक्षात विभागात ६९ रुग्ण तर व्हेंटिलेटरवर ८४ रुग्ण आहेत.
ग्रामीण भागात सर्वाधिक ५ हजार ५०३ क्रियाशील रुग्ण आहेत. त्यातील २ हजार २३३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर २ हजार ४९४ रुग्ण ऑक्सिजन विरहीत खाटांवर आहेत. ऑक्सिजन खाटांवर ६४७ तर अतिदक्षता विभागात १३८ रुग्ण आहेत. व्हेंटिलेटरवर ९१ रुग्ण आहेत.
चौकट
तिसऱ्या लाटेसाठी खाटांचे नियोजन
तिसऱ्या लाटेची शक्यता बघता प्रशासनाकडून खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. २१९ सीसीसी केंद्र, ६१५ डीसीएचसी केंद्र, तर ६४
डीसीएच केंद्र सध्याच्या घडीला आहेत. यात ५८ हजार २२६ खाटा ऑक्सिजन विरहीत आहेत. १७ हजार १९१ ऑक्सिजन खाटा, तर ३ हजार ७५९ खाटा अतिदक्षता विभागात राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १ हजार ८८७ व्हेंटिलेटर्स सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. यातील डीसीएच केंद्रातील ५ टक्के सीसीएचसी केंद्रातील १० टक्के आणि डीसीसीसी केंद्रातील १५ टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोट
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या कमी होत आहे. काही ठिकाणी रुग्ण नसल्याने तेथील कोविड केअर केंद्र बंद करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. गरजेनुसार बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील.
-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
सध्यस्थितीतील कार्यान्वीत रुग्ण व्यवस्थापन