पीएचडी ‘गाईड’ची संख्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:51+5:302021-07-02T04:08:51+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उशिरा का होईना पीएचडी मार्गदर्शक (गाईड) निवडीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीची अंमलबजावणी केली ...

The number of PhD guides will increase | पीएचडी ‘गाईड’ची संख्या वाढणार

पीएचडी ‘गाईड’ची संख्या वाढणार

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उशिरा का होईना पीएचडी मार्गदर्शक (गाईड) निवडीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पीएचडी गाईडची संख्या वाढणार आहे. परिणामी विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील संशोधनाला चालना मिळणार आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधक केंद्रातून पीएचडी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, काही विषयांसाठी अनेक विद्यार्थ्यांना गाईड मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. सुमारे पाच वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी गाईडसंदर्भात नियमावली प्रसिद्ध केली होती. त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेसुद्धा विद्या परिषदेमध्ये आवश्यक निर्णय घेतले. मात्र, प्रशासकीय पातळीवर या निर्णयांची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही अनेक प्राध्यापकांना पीएचडी गाईड होता येत नव्हते. त्यावर भारतीय एलिजिबल स्टुडंट टीचर्स असोसिएशनतर्फे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. सामंत यांनी विद्यापीठाला सूचना दिल्यानंतर गुरुवारी विद्यापीठाने पीएचडी गाईड संदर्भातील सुधारित नियमावली प्रसिद्ध केली.

जुन्या नियमानुसार गाईड म्हणून निवड होण्यासाठी संबंधित प्राध्यापकाचा शैक्षणिक अनुभव ग्राह्य धरला जात होता. तसेच पीएचडी प्राप्त केल्यानंतर तीन वर्षांनंतर पीएचडी गाईड म्हणून मान्यता दिली जात होती. मात्र, नवीन नियमावलीनुसार पीएचडी पूर्ण केल्यानंतर काही रिसर्च पेपर प्रसिद्ध करणाऱ्या प्राध्यापकांना त्वरित पीएचडी गाईड म्हणून काम करणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

-----------

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पीएचडी गाईडसंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाने यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. मात्र, आता अनेक प्राध्यापकांना गाईड म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे. विद्यापीठ प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे काही वर्षे विद्यार्थ्यांना गाईड मिळू शकले नाहीत.

- अजय दरेकर, भारतीय एलिजिबल स्टुडंट टीचर्स असोसिएशन, अध्यक्ष

------------

विद्यापीठातर्फे पीएचडी गाईडबाबत सुधारित नियमावली प्रसिद्ध करण्यात आले आहे. काही विषयांसाठी पीएचडी गाईड उपलब्ध नव्हते. मात्र, आता पीएचडी गाईडची संख्या वाढणार आहे.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The number of PhD guides will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.