ढेरपोट्या पोलिसांची संख्या पुण्यात कमी, ७४ टक्के तंदुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:38+5:302021-09-09T04:15:38+5:30
तरी फक्त २६०० जण घेतात पोलीस आहार भत्ता : अर्ज करण्यास टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना कोणत्यावेळी ...
तरी फक्त २६०० जण घेतात पोलीस आहार भत्ता : अर्ज करण्यास टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांना कोणत्यावेळी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची काहीही शाश्वती नसते. त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी हे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावेत, अशी अपेक्षा असते. या तंदुरुस्त पोलिसांना शासनाकडून दरमहा अडीचशे रुपये आहार भत्ता दिला जातो; मात्र त्यासाठी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) प्रमाणपत्र सादर करुन अर्ज करावा लागतो. पुणे शहर पोलीस दलातील २ हजार ६०० पोलीस अधिकारी, कर्मचारी बीएमआय प्रमाणपत्रासह अर्ज करुन सध्या आहार भत्ता घेत आहेत.
पुणे शहर पोलीस दलात ७४४ पोलीस अधिकारी आणि ७ हजार ९०० पोलीस कर्मचारी आहेत; मात्र त्यांच्यापैकी केवळ साडेतीन हजारांपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बीएमआयची चाचणी करुन घेतात. त्यापैकी सुमारे ९०० जण या चाचणीत ‘अनफिट’ ठरले आहेत.
शिवाजीनगर येथील पोलीस रुग्णालयात बीएमआय चाचणीची विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र त्याचा अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी लाभ घेत नाहीत. त्याचबरोबर पोलिसांचा दिनक्रम खूप व्यस्त असतो. त्यामुळे अनेकदा इच्छा असली तरी बीएमआय चाचणी करुन घेणे त्यांना शक्य होत नाही. यापूर्वी खासगी रुग्णालयातूनही ‘फिट’ प्रमाणपत्र घेता यायचे. पण आता केवळ शासकीय रुग्णालयातूनच हे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळेही शासकीय रुग्णालयात जाऊन अशी चाचणी करुन घेण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी टाळतात.
अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी नियमित व्यायाम करीत असल्याने ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. विशेषत: अधिकाऱ्यांचे प्रकृतीकडे अधिक लक्ष असते. ते तंदुरुस्त असले तरी अडीचशे रुपयांच्या भत्त्यासाठी ते अर्ज करीत नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अनेकांना आपण ‘फिट’ ठरणार नाही, असे वाटत असते. त्यामुळे ते चाचणीच करुन घेत नाहीत. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारे चाचणी करुन घेण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.
चौकट
जेवायलाही वेळ मिळत नाही
“दररोजचा दिनक्रम व्यस्त असतो. त्यात घर आणि पोलीस ठाणे यात खूप अंतर आहे. ड्युटी १२ तासांची असली तरी १२ तासानंतर सुटका होईलच असे सांगता येत नाही. अनेकदा तपास, बंदोबस्ताचे काम लागले की जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत ‘फिट’ असलो तरी अशी चाचणी करुन घेऊन अर्ज करायला वेळ मिळत नाही.”
-एक पोलीस कर्मचारी