राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीव्र इच्छुकांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 12:26 PM2019-09-07T12:26:37+5:302019-09-07T12:35:31+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे...

The number of strong aspirants drecreased in the NCP | राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीव्र इच्छुकांची संख्या घटली

राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीव्र इच्छुकांची संख्या घटली

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारी अंतिम करण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसे इच्छुकांची संख्या कमी

सुषमा नेहरकर-शिंदे- 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधूनपुणे शहरात आमदारकीसाठी तीव्र इच्छुक असलेले मातब्बर निवडणुकीतून माघार घेऊ लागले आहेत. ‘यंदा आमदार व्हायचेच,’ म्हणाणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुक आता ‘पक्षाने लढायला सांगितले तर लढू,’ असे म्हणू लागले आहेत. यामुळे दोन-अडीच महिन्यांपूर्वी आठ मतदार संघातून इच्छुक असणाऱ्या ५२ जणांची संख्या आता निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. कोथरुडसह काही मतदारसंघामधून तर एकही जण उमेदवारीसाठी पुढे न आल्याने पक्षनेतृत्वही हतबल झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे. -राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगच्या जोरदार चर्चा आहेत. सर्वच पक्षांकडून जागा व उमेदवार निश्चितीचे काम अंतिम टप्प्यावर असून यासाठी बैठका, गुप्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे झाली. 
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन महिन्यांपूर्वी ‘राष्ट्रवादी’ने इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात ‘राष्ट्रवादी’चे बाल्लेकिल्ले समजल्या जाणाऱ्या खडकवासला, हडपसर, वडगावशेरीमध्ये तर आमदारकीसाठी प्रचंड रस्सीखेच होती. परंतु, उमेदवारी अंतिम करण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसे इच्छुकांची संख्या कमी होत आहे. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्षपदी निवड झालेल्या रूपाली चाकणकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके इच्छुक आहेत. पंरतु आमदारकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या रूपाली चाकणकर यांनी पक्षाने प्रदेशाध्याक्षपदाची जबाबदारी दिली असल्याने आमदारकीची निवडणुक लढविण्यास आता इच्छुक नसल्याचे सांगितले. तर, दत्ता धनकवडे यांनीदेखील अप्रत्यक्ष निवडणुकीमधून माघारी घेतली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच असताना आता अनेक जण निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाने लढायला सांगितले तर लढावावेच लागेल, आम्ही लढणारे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. हीच परिस्थिती वडगावशेरी मतदारसंघात देखील तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरुड मतदारसंघात ‘उमेदवारी नको रे बाबा’ असे पक्षातले कार्यकर्ते म्हणत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शहरातील महत्त्वाच्या नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 

Web Title: The number of strong aspirants drecreased in the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.