‘त्या’ निर्णयामुळे घटली यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:08+5:302021-03-25T04:12:08+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नियमितपणे अर्ज करण्याची मुदत ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नियमितपणे अर्ज करण्याची मुदत संपली आहे. यंदा बारावीसाठी १३ लाख १७ हजार ७६, तर दहावीसाठी १६ लाख २०४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत १ लाखाहून ३ हजार ४८१ एवढी घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या विलंब-अतिविलंब शुल्क आकारून अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे त्यात फारशी वाढ होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्य मंडळाअंर्तगत येणाऱ्या नऊ विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या एप्रिल-मे महिन्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी बारावीच्या एकूण ६ लाख ७ हजार ९८८ मुलींनी, तर ६ लाख ३३ हजार २६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच दहावीच्या ७ लाख ३३ हजार ५३२ मुलींनी, तर ८ लाख ६६ हजार ५७२ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे किंवा अनेकांनी शैक्षणिक ‘गॅप’ घेण्याचे ठरविले असल्याने ही संख्या घटली असावी, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे. मात्र, राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या अंतर्गत गुणांच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालावर परिणाम झाला होता. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण देण्याचे बंद केल्याने निकालात घट झाली होती. त्यामुळे दोन वर्षापूर्वी दहावीचा निकाल कमी लागल्याने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
--
दोन वर्षांपूर्वी दहावीचा निकाल कमी लागला होता. त्यामुळे यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कोरोनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेस नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असा तर्क लावता येणार नाही.
-दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
----
विभागीय मंडळनिहाय दहावी-बारावीच्या परीक्षेस नोंदणी करणारे विद्यार्थी
मंडळाचे नाव बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी
पुणे २,३०,९८३ २,७१,५०३
नागपूर १,४०,६१३ १,५६,२७१
औरंगाबाद १,४६,४१० १,७७,३११
मुंबई २,९२,७६८ १,६९,१७४
कोल्हापूर १,१७,५१९ १,३६,२४२
अमरावती १,३१,९३६ १,५९,७७१
नाशिक १,५१,६८३ २,०१,६७५
लातूर ७७,७९४ १,०५,९१७
कोकण २७,३७० ३१,५८१