दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी वाढले; बारावीचे घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:27+5:302021-03-23T04:12:27+5:30
इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट असले तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर ...
इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट असले तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी दहावी-बारावीचा निकाल चांगलाच वाढला होता. परंतु, कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इयत्ता बारावीतील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला असावा, असे बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करतात. यंदा दहावीच्या २ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी या तीनही जिल्ह्यांमधून परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
------
दहावीचे परीक्षार्थी
२०२० : २,५८,२०४
२०२१ : २,७१,५०३
------------
बारावीचे परीक्षार्थी
२०२० : २,४१,८१५
२०२१ : २,३०,९८३
--------------------
१) दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे
२) बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे
-------
१) वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, या उद्देशाने मराठवाडा व विदर्भातील काही विद्यार्थी पुणे विभागांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावीला प्रवेश घेत होते. परंतु, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशी कोणतीही मर्यादा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राहणार नाही, असे राज्य शासनाने जाहीर केले. त्यामुळे यंदा पुणे विभागातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असावी.
२) विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महाराष्ट्रातील सर्वच भागांतून इयत्ता बारावीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली असल्याचे बोलले जात आहे.