राज्यात वाढली ‘सेट’धारक बेरोजगारांची संख्या, निकालाचा टक्का वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:13 AM2019-12-02T01:13:22+5:302019-12-02T01:13:36+5:30
- राहुल शिंदे पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार प्राध्यापक पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट या परीक्षेचा निकाल दीड ...
- राहुल शिंदे
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार प्राध्यापक पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट या परीक्षेचा निकाल दीड ते ३ टक्क्यांपर्यंत लागायचा. तो आता ६ टक्क्यांवर लावला जात आहे. परंतु नोकºयाचा उपलब्ध नसल्याने सेट होऊनही बेरोजगार रहावे लागत असणाऱ्यांचा टक्काही त्याबरोबरच वाढला आहे.
सेट निकालाचा टक्का अत्यल्प असून उत्तीर्णांचे प्रमाण किमान ६ टक्के तरी असावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून निकाल ६ टक्क्यांवर गेला आहे. काहीही करुन निकाल सहा टक्के लावण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात असतानाच आता सेटधारक बेरोजगारांचा आकडाही वाढू लागला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेतली जाते. २०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेत ६२,४०४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ४,०६८ म्हणजे ६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०१९ मधील परीक्षेस १,०२,५७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७९,८७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ५,४१६ म्हणजे ६.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातही संरक्षण व सामरिकशास्त्र विषयाचा निकाल २०१८ मध्ये १७.१४ टक्के तर २०१८ मध्ये १६.७ टक्के लागला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या भाषांचा व इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आदी विषयांचा निकाल ६ ते ९ टक्क्यांच्या दरम्यान लागला आहे.वर्षभर मेहनत करून ' सेट ' परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढे काय करायचे असा प्रश्न आता पदवीधारकांसमोर उभारला आहे
एखाद्या परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत याबाबतचे धोरण निश्चित करून निकाल जाहीर करणे योग्य होणार नाही. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेट-सेट परीक्षांचा निकाल सहा टक्के लावण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार
झाला पाहिजे. - डॉ. अरूण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
प्राध्यापक पदासाठी कोणत्या आधारे आपण उमेदवाराची नियुक्ती करतो याचा विचार झाला पाहिजे. रिक्त जागा आणि उत्तीर्ण केले जाणारे उमेदवार याचा विचार केला जात नाही. नेट-सेटमधून आलेल्या शिक्षकांकडे दर्जा नसेल तर शिक्षणाचा दर्जा घसणार आहे. - प्रा.नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ