रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाणार
By Admin | Published: June 29, 2015 06:52 AM2015-06-29T06:52:20+5:302015-06-29T06:52:20+5:30
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
पुणे : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय प्रक्रिया संपल्यानंतरही काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सहजरीत्या प्रवेश मिळणार आहे. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थीही नंतर प्रवेश रद्द करतात. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढू शकतो.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये सुमारे ७२ हजार प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व त्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार समितीतर्फे पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. त्यानुसार गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस प्रवेशाची पहिली फेरी घेण्यात आली.
या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
सुमारे ७२ हजार जागांसाठी ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे सुमारे ४ हजार जागा रिक्त राहणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, पहिल्या फेरीत स्थान मिळूनही १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता प्रक्रियेतून बाहेर पडणे पसंत केले आहे.