पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:00 AM2019-04-12T10:00:00+5:302019-04-12T10:00:02+5:30
मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे.
पुणे : जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला असून त्यामुळे पुणे शहर व लगतच्या भागातील वाहनांची संख्या जवळपास ३९ लाख एवढी झाली आहे. तसेच मागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे. त्यामध्ये तब्बल ३ लाख केवळ दुचाकी आहेत.
मागील काही वर्षांपासून पुणे शहर व लगतच्या परिसरातील उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी वेगाने वाढत गेल्याने लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढीचा वेग अधिक आहे. आरटीओच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात. जिल्ह्याचा विचार केल्यास पुण्यामध्ये शहरासह सासवड, शिरूर, भोर, वेल्हा, हवेली तर पिंपरी चिंचवडमध्ये शहरासह जुन्नर, मावळ, लोणावळा, खेड हा भाग येतो. बारामतीअंतर्गत बारामतीसह इंदापुर व दौंड हे तीन तालुके आहेत.
आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये साहजिकच पुणे शहराचा वाटा अधिक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ लाख ७५ हजार तर बारामतीमध्ये ४ लाख ६ हजार अशी एकुण ६१ लाख ७० हजार वाहने विभागात नोंदविली गेली आहेत. मागील वर्षभरात पुण्यामध्ये २ लाख ६१, पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५४ हजार तर बारामतीमध्ये ३१ हजार ५०० वाहनांची नोंदणी झाली.
-----------
पुणे जिल्ह्यातील वाहनांची एकुण संख्या
विभाग वाहन संख्या
पुणे (एमएच १२) ३८,८८,६९०
पिंपरी चिंचवड (एमएच १४) १८,७५,८२१
बारामती (एमएच ४२) ४,०६,०८५
एकुण ६१,७०,५९६
--------------------------------------
मागील तीन वर्षात झालेली वाहन नोंदणी
विभाग २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९
पुणे (एमएच १२) २,७०,३०७ २,९१,११७ २,६१,४१०
पिंपरी चिंचवड (एमएच १४) १,२५,३७७ १,५४,५९१ १,५४,४४४
बारामती (एमएच ४२) २३,६६५ ३२,६८१ ३१,५३०
----------------------------------------------------------------
मागील पाच वर्षांतील वाहन संख्या (एमएच १२)
वर्ष एकुण वाहन संख्या
२०१४-१५ २८,५०,४५१
२०१५-१६ ३०,७२,००३
२०१६-१७ ३३,३७,३७०
२०१७-१८ ३६,२७,२८०
२०१८-१९ ३८,८८,६९०
--------------------------
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये नोंदणी झालेली वाहने (एमएच १२)
दुचाकी १,७६,३१४
चारचाकी ४७,६१७
रिक्षा १६,०४४
कॅब/टॅक्सी ६,७३२
इतर १४,७०३
एकुण २,६१,४१०
----------------------