स्वाईन फ्लू बळींची संख्या तीसवर
By admin | Published: April 9, 2017 04:43 AM2017-04-09T04:43:19+5:302017-04-09T04:43:19+5:30
शहरात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीसवर गेली असून, ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती
पुणे : शहरात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीसवर गेली असून, ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शुक्रवारी नगरमधील घोडेगावच्या श्रुती कळसकर तीन वर्षांच्या मुलीचा एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.
गेल्या तीन महिन्यांत स्वाईन प्लूने डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यात शहरात पाच रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फेब्रुवारीत २५ रुग्ण आढळून आले. मार्च महिन्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या काळात शहरात किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत होती. अनेकदा दिवसा उष्मा जास्त, तर रात्री गारवा अशी स्थिती होती. त्यामुळे मार्च महिन्यात १२१ रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे दिसून आले.
४९ जणांवर उपचार
जानेवारी महिन्यापासून २ लाख ३० हजार ६५० संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील ३ हजार ६१७ रुग्णांना टॅमीफ्लू पाठविला. त्यातील ७७७ जणांचा घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यातील १९३ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट
झाले. बाधितांपैकी ४९ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून, ११४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.