बाधितांची संख्या आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:29+5:302021-09-21T04:11:29+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती येथे घेतली कोरोना आढावा बैठक बारामती : परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात ...
उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती येथे घेतली कोरोना आढावा बैठक
बारामती : परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजनामध्ये सातत्य राखावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती परिसरातील सार्वजनिक कामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शनिवारी (दि. १८) कोविड -१९ उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्य:स्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कोरोना चाचण्या, पॉझिटिव्हिटी रेट, मृत्यू रेट, बाधित ग्रामपंचायतीची संख्या लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बारामती शहरात, तसेच ग्रामीण भागात सोयी-सुविधा तयार ठेवणे आवश्यक आहे. कोरोना उपाययोजनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा योग्य वापर करण्यात यावा. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
-----------------------
विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या जागा, परकाळे बंगला येथील कॅनॉलवरील सुशोभीकरण कामाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विकास कामांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच कामाचा दर्जा उत्तम राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. सर्वच विभागांनी विकासकामे समन्वयाने पार पाडावीत, निधीचा पुरेपूर वापर करावा. सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
--------------------------
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
शासकीय वैद्यकीय महविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची क्षमता एक हजार लिटर्स प्रतिमिनीट असून वातावरणातून हवा घेऊन ऑक्सिजन निर्मिती केली जाते. या वेळी प्रकल्प संचालक केशव घोडके, अभ्यागत समितीचे सदस्य, प्राध्यापक, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
------------------------------
फोटो ओळी : बारामती परिसरात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांची पहाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
२००९२०२१-बारामती-०६