यावर्षी ६२ टक्के क्षयरोगींना पोषण आहार भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:49+5:302021-08-18T04:14:49+5:30

पुणे : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रतिमहिना पोषण आहार ...

Nutrition allowance for 62% TB patients this year | यावर्षी ६२ टक्के क्षयरोगींना पोषण आहार भत्ता

यावर्षी ६२ टक्के क्षयरोगींना पोषण आहार भत्ता

googlenewsNext

पुणे : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रतिमहिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. मात्र, अनेक रुग्णांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने हा भत्ता त्यांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये ३६ टक्के, २०२० मध्ये ६९ टक्के, तर जुलै २०२०१ पर्यंत ६२ टक्के रुग्णांना पोषण आहार भत्ता देण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

क्षयरोग हा फुप्फुसांशी संबंधित आजार असला तरी त्वचा, हाडे, सांधे, मेंदू अशा विविध भागांमध्ये तो पसरू शकतो. क्षयरोगाचा रुग्ण खोकतो, शिंकतो त्यावेळी क्षयरोगाचे जंतू वातावरणात पसरतात. श्वासावाटे ते निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. एक क्षयरोगी वर्षभरात १० ते १५ माणसांना हा आजार पसरवू शकतो. कोरोनापूर्व काळात महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी १९ हजार क्षयरुग्णांची नोंद होत असे. जानेवारी महिन्यात १६ हजार ९६९ रुग्णांची नोंद झाली होती. एप्रिल महिन्यात त्यात घट होऊन १० हजार ३६ एवढ्या रुग्णांची नोंद झाली. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये ४१ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली आहे.

---------------------

क्षयरोगाची लक्षणे :

* दोन आठवड्यांहून अधिक खोकला

* संध्याकाळचा ताप

* वजनात घट

* भूक न लागणे

* मानेवर गाठी येणे

-------------------

क्षयरोग रुग्णांची नोंदणी :

२०१९ २०२० जुलै २०२१ पर्यंत

शासकीय ७२६६ ४८६१ २८१४

खासगी ७०५ ६८७ ३२०

------------------------------------------------

एकूण ७९७१ ५५४४ ३१३४

-----------------------------------------------------------------

पोषण आहार भत्ता :

२०१९ २०२० जुलै २०२१ पर्यंत

पात्र लाभार्थी ६१२० ४५८० १८९९

बँक खाते असलेले लाभार्थी ३२९१ ३१५५ १४९९

टक्केवारी ५४% ६९% ७९%

भत्ता मिळालेले लाभार्थी २२२६ ३१५५ ११७९

लाभार्थींची टक्केवारी ३६% ६९% ६२%

-------------------

एखाद्या रुग्णाला क्षयरोगाचे निदान झाले की त्यांना पोषण आहार भत्ता योजनेची माहिती देऊन बँकेत खाते काढण्यास सांगितले जाते. ७०-८० टक्के लोकांची बँक खाती सुरू असतात, तर काहींची बंद झालेली असतात. त्यांना दुसऱ्या बँकेत खाते सुरू करण्यास सांगितले जाते आणि पोषण आहार भत्ता जमा केला जातो. खासगी रुग्णालयांमधील बहुतांश रुग्ण भत्ता नाकारतात. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील थोरॅसिक हॉस्पिटलमध्ये क्षयरोगाचे निदान झालेले रुग्ण वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक याची माहिती देत नाहीत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सध्या जोमाने काम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

- डॉ. संजय दराडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी

Web Title: Nutrition allowance for 62% TB patients this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.