नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:01 IST2025-01-07T11:01:20+5:302025-01-07T11:01:39+5:30
नायलॉन मांजाची हौस माणसाच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचली असून शहरात जीवघेणे अपघात घडू लागले आहेत

नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई
पुणे: संक्रांती सणानिमित्त पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून नायलाॅन मांजाचे रीळ जप्त करण्यात आले. बिबवेवाडी आणि धानोरी भागात ही कारवाई करण्यात आली.
बिबवेवाडी भागातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर परिसरात एकजण नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस शिपाई सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून नायलाॅन मांजाचे ५० रीळ जप्त केले. जप्त केलेल्या मांजाची किंमत दहा हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदेशाचा भंग करणे, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये पृथ्वीराज राजेश म्हस्के (वय २३, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुमित ताकपेरे यांनी याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार आंग्रे तपास करीत आहेत.
दरम्यान, विश्रांतवाडी भागातील मुंजाबा वस्तीत नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून नायलाॅन मांजाचे रिळे जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुंजाबा वस्तीमधील एका ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस कर्मचारी नागेश कुंवर यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार केंद्रे तपास करीत आहेत.