स्वयंपाक घरातील ओट्याची रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:49+5:302021-06-26T04:09:49+5:30
ओटा किती मोठा घ्यायचा हे ठरविताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ओट्याची उंची. इथे सर्वमान्य, आदर्श माप ...
ओटा किती मोठा घ्यायचा हे ठरविताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ओट्याची उंची. इथे सर्वमान्य, आदर्श माप विचारात न घेता स्वयंपाकघरात काम करणाऱ्याची सोय लक्षात घ्यावी. पोळी लाटताना पाठीत वाकावे लागणार नाही किंवा खांदेही उचलले जाणार नाही अशी उंची योग्य. ओट्यावर शेगडी ठेवून त्यावरच्या कढईतला पदार्थ नीट दिसेल या हिशोबानं उंची ठरवावी. ओट्याच्या रुंदीचा विचार करताना शेगडीच्या पुढे पोळपाट, परात ठेवायला जागा मिळून लाटताना होणाऱ्या हाताच्या हालचालींनाही पुरेशी जागा मिळायला हवी.
ओट्याशी काम करणाऱ्या व्यक्तीची पोहोचपण लक्षात घ्यायला हवी. ओट्याची संपूर्ण रुंदी व्यक्तीच्या हाताच्या टप्प्यात असायला हवी. आपल्या पोहोचेच्या कक्षा असतात. हाताची कोपरं शरीराला जुळवलेली राहून ज्या अंतरावर काम करता येतं ती प्राथमिक कक्षा अर्थात प्रायमरी सर्कल खांद्यापासून हात मोकळे ठेवून ज्या अंतरापर्यंत पोहोचता येतं ती माध्यमिक कक्षा सेकंडरी सर्कल आणि कमरेत वाकून जिथवर पोहोचता येतं ती अर्थातच तिसरी कक्षा म्हणजेच टेरेटिअरी सर्कल. जी बाब शारीरिक पोहोचेच्या टप्प्यांची तीच दृष्टीचीही. स्थिर डोळ्यांना जिथवर पोहोचता येतं ती दृष्टीची प्राथमिक कक्षा. डोळ्यांची हालचाल करून माध्यमिक कक्षेपर्यंत दृष्टीचा आवाका वाढतो, तर तिसऱ्या कक्षेत दृष्टीनी पोहोचायला मात्र मान हलवावी लागते. वारंवार वापरल्या जाणाऱ्या, सर्वाधिक लागणाऱ्या वस्तू या प्राथमिक कक्षेत असल्या की श्रम कमी होतात आणि वेळही वाचतो. इथे स्वयंपाकघराचा विचार केला तर चमचे, डाव, मिसळणाचा डबा, चहा, साखर, मीठ इत्यादी गोष्टी अगदी सतत लागतात. तेव्हा या गोष्टींची सोय हे दृष्टी आणि हाताच्या या दोन्हीच्या प्राथमिक कक्षेत असणं गरजेचं आहे. त्या तुलनेत क्वचित लागणाऱ्या वस्तू तिसऱ्या कक्षेतल्या कपाटांमध्ये ठेवल्या तर त्यांची अडचण होत नाही. त्यातसुद्धा काम करणारी व्यक्ती डावरी असेल तर त्याचाही विचार करायला हवा. वरकरणी क्षुल्लक भासणारे हे सूक्ष्मभेद वस्तू आणि वास्तूरचनेला खूप मोलाचे ठरतात. यामध्ये व्यक्तीच्या फक्त सोयीचाच नाही तर स्वास्थ्याचाही खोल विचार दडलेला आहे. स्वयंपाकघराप्रमाणे इतर खोल्यांच्या रचनेकडे, कार्याभ्यासाच्या चष्म्यातून पाहता येते.
- स्नेहल जोशी