एमपीएससी परिक्षा घेण्याची ओबीसींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:05+5:302020-12-16T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा आरक्षण आणि कोरोनाचे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा आरक्षण आणि कोरोनाचे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या निकालाचा कालावधी अनिश्चित असल्याने त्यासाठी न थांबता एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक त्वरीत जाहीर करावे, अशी मागणी ओबीसी संघर्ष सेनेने केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे. मंगळवारी (दि. १५) आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण हाके, अरविंद वेलकर, शंकर ठाकरे, प्रवीण पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
हाके म्हणाले की, परीक्षा कधी होणार आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे त्यांची दिशा भरकटत चालली असून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे. ज्या प्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रियेवरील स्थागिती उठविली त्या पद्धतीने ‘एमपीएससी’चे वेळापत्रक जाहीर करावे. महेश झोरे या विद्यार्थ्यांने परीक्षा वेळेवर होईनात म्हणून आत्महत्या केली आहे. अजून किती विद्यार्थ्यांचा जीव सरकार घेणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यसेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा राजपत्रित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. याला विरोध नसून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि वयाचा विचार करण्याची गरज आहे. सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना परीक्षा महत्वाची आहे. वेळापत्रक जाहीर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हाके यांनी दिला.