राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसीमंत्री अतुल सावे यांचा दावा
By नितीन चौधरी | Published: December 5, 2023 04:53 PM2023-12-05T16:53:11+5:302023-12-05T16:53:37+5:30
मराठा तसेच अन्य समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून सध्या ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, असा दावा गृहनिर्माण तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी केला आहे. मराठा तसेच अन्य समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत, त्या पार्श्वभुमीवर या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
म्हाडा, पुणे विभागाच्या सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता सावे म्हणाले, “आयोगाकडून मराठा आरक्षणावर ज्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदस्यांनी आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दुसरे सदस्य मिळून काम करतील असे वाटते. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. आरक्षणाला साच्यात बसवून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करीत आहेत. त्याला नक्कीच यश मिळेल.”
तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्याबाबत ते म्हणाले, “मोदी हे २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेऊन नागरिकांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे मतदारांनी भाजपच्या पारड्यात मते टाकल्याने विजय मिळाला. तेलंगणाच्या जागा कमी आल्या असल्या तरी तेथे मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वावर नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे येणाऱ्या लोकसभा तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळेल.”