ओबीसी आरक्षणसंदर्भातील अंमलबजावणी तत्काळ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:44+5:302021-06-11T04:08:44+5:30
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार न्यायालयात लक्ष घाल नाही याच्या निषेधार्त आंबेगाव तालुका भाजपा-ओबीसी मोर्चाच्या वतीने घोडेगाव येथील तहसील कार्यालयावर ...
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार न्यायालयात लक्ष घाल नाही याच्या निषेधार्त आंबेगाव तालुका भाजपा-ओबीसी मोर्चाच्या वतीने घोडेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनंथा गवारी यांच्याकडे दिले. याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा आंबेगाव तालुकाध्यक्ष सुरेश अभंग, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, उपाध्यक्ष विजय पवार, संघटक संदीप बाणखेले, प्रवीण डोके, दुर्योधन वायकर, आकाश भोसले, दीपक घोडेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले असून राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठणदेखील केलेले नाही. १२ डिसेंबरनंतर देखील दहा-बारा तारखा सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. मात्र, एकाही तारखेला राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पूर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या आदेशाबाबत पत्रव्यवहार केला. या एकाही निवेदनावर उत्तर आले नाही. त्यामुळे याचा फटका ओबीसी समाजाला बसत असल्याने यावर राज्य सरकारने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जोपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी दिला आहे.