OBC Reservation : एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ : विजय वड्डेटीवारांचा विरोधकांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 03:21 PM2021-06-26T15:21:20+5:302021-06-26T15:31:00+5:30
सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन मराठा किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे.
पुणे : राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करत देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख नेतेमंडळी रस्त्यावर उतरली आहे. याचवेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; आता सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ असे आवाहन केले आहे.
लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आह. या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. वड्डेटीवार म्हणाले, या परिस्थितीत एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. तरच आरक्षणाचा किंवा किंवा इतर मार्गी लागणे शक्य आहे. तसेच सर्वच राजकीय पक्ष आंदोलन हे ताकद वाढण्यासाठी करतात. पण कुठल्याही सामाजिक संघटनांचे आंदोलन हे समाजासाठी असतात. त्यामध्ये विश्वासार्हता असते. सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन हा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे.
आम्ही कितीही आंदोलने केली. पण त्यातून वडेट्टीवार काँग्रेसची भूमिका मांडतात हाच अर्थ काढला जाईल. तसेच भाजपाने आंदोलने केली तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आहे, हेच समजले जाणार आहे असेेेही मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
.... पण निवडणूक आली का तुझी जात कंची? छगन भुजबळ
पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो असे सांगत भुजबळ म्हणाले,ओबीसींमध्ये कुठल्या जातीचा उमेदवार उभा राहिला तर इतर जाती समर्थन करत नाही ही परिस्थिती आहे. तसेच मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस. पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे जाऊन इम्पेरीकल डेटा मागावा असेही छगन भुजबळ म्हणाले.