लठ्ठपणामुळे गर्भधारणेत निर्माण होत आहेत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:21+5:302021-01-16T04:15:21+5:30

स्थूलतेमुळे अनियमित ओव्ह्युलेशन, त्याचप्रमाणे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचाही सामना करावा लागू शकतो. वंध्यत्वाची सर्वात सामान्य कारणे म्हणजे पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस आणि ...

Obesity causes problems in pregnancy | लठ्ठपणामुळे गर्भधारणेत निर्माण होत आहेत अडचणी

लठ्ठपणामुळे गर्भधारणेत निर्माण होत आहेत अडचणी

googlenewsNext

स्थूलतेमुळे अनियमित ओव्ह्युलेशन, त्याचप्रमाणे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचाही सामना करावा लागू शकतो. वंध्यत्वाची सर्वात सामान्य कारणे म्हणजे पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस आणि वाढते वजन अशी आहेत. वंध्यत्व त्रासदायक आणि निराशाजनकही असू शकते. पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पीसीओएस) या अवस्थेमध्ये अंडाशयांत छोट्या पाण्याने भरलेल्या गाठी चिकटलेल्या असतात. याशिवाय हार्मोन्सचे असंतुलन दिसून येते. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढते आणि इन्सुलिनच्या चयापचयावर वाईट परिणाम होतात, मासिक पाळी अनियमित होते व रक्तस्त्रावही कमी होतो.

गेल्या काही वर्षांत पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पीसीओएसकडे एक गंभीर समस्या म्हणून पाहणे आणि योग्य वेळी उपचार करणे ही काळाची गरज आहे. पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो. कारण त्यामुळे अनियमित ओव्ह्युलेशन होते किंवा ओव्ह्युलेशन होत नाही. वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे कठीण होऊन बसते. वजन जास्त असल्यास गर्भाशयाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे प्रजनन समस्याही उद्भवू शकतात.

स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.माधुरी बुरांडे लाहा म्हणाल्या, ‘लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. लठ्ठ स्त्रियांमध्ये मधुमेह, पीसीओडी, उच्च रक्तदाब, हदयविकार आदी गुंतागुंत वाढत असल्याने, त्याचा थेट परिणामही प्रजननावर होऊ शकतो. त्याकरिता योग्य वजन राखणे, नियमित व्यायाम करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

डॉ.निशा पानसरे म्हणाल्या, ‘वंधत्वासारख्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीत बदल व व्यायाम करणे योग्य ठरेल. व्यायामासह वजन कमी होणे आवश्यक आहे. बॉडी मास इंडेक्स २४ पेक्षा कमी असावा. ध्यान आणि योगसाधनाही फायदेशीर ठरू शकते, तसेच रात्री पुरेशी झोप घ्या. वरीलपैकी कोणतीही समस्या असलेल्या स्त्रियांनी उच्च प्रथिनयुक्त आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार निवडणे आवश्यक आहे. दुग्धजन्य पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक, कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.’

Web Title: Obesity causes problems in pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.