कचरावेचकाच्या प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ
By admin | Published: June 28, 2017 04:21 AM2017-06-28T04:21:07+5:302017-06-28T04:21:07+5:30
नेहमीप्रमाणे कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करीत असताना रस्त्याच्या मधोमध पडलेली बॅग आणि त्यामधील लॅपटॉप
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नेहमीप्रमाणे कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करीत असताना रस्त्याच्या मधोमध पडलेली बॅग आणि त्यामधील लॅपटॉप कचरावेचकाने प्रामाणिकपणे त्याच्या मालकाला परत केला. स्वच्छ संस्थेच्या समन्वयकाच्या मदतीने दोन दिवस शोध घेतल्यानंतर मालकापर्यंत पोहोचण्यात यश आले. विशेष म्हणजे हा लॅपटॉप टाटा मोटर्सचे विभागीय व्यवस्थापक नीलेश चौधरी यांचा होता.
लक्ष्मण खंदारे (रा. पाटील इस्टेट वसाहत, शिवाजीनगर) बाणेर बालेवाडी भागामध्ये कचरा संकलनाचे काम करतात. शनिवारी त्यांना बालेवाडीमध्ये रस्त्याच्या मधोमध एक बॅग पडलेली दिसली. गाडीखाली जाऊ नये, म्हणून त्यांनी ही बॅग उचलून घेतली. बराच वेळ बॅग शोधत कोणीतरी येईल, या आशेने ते उभे होते. आसपासच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये बॅगेसंदर्भात चौकशी केली. परंतु, बॅगेच्या मालकाचा शोध लागला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी बाणेर बालेवाडी भागाचे स्वच्छ संस्थेचे समन्वयक गजानन पाडुळकर यांना फोन करून माहिती दिली. रविवारी पुन्हा ते बॅग सोबत घेऊन नेहमीप्रमाणे कामावर गेले. गजानन यांनी त्यांची भेट घेतली. दोघांनी बॅगेतील कागदपत्रे आणि व्हिजिटिंग काडर््स तपासली. त्यामध्ये त्यांना चौधरी यांचे टाटा मोटर्सचे ओळखपत्र मिळाले. मात्र, त्यावर मोबाईल क्रमांक नव्हता. गजानन यांनी गुगलवर चौधरी यांच्या नावाने सर्च केले असता त्यांची संपूर्ण माहिती (प्रोफाईल) आले. परंतु, त्यामध्ये मोबाईल क्रमांक नव्हता. गजानन व खंदारे यांनी चौधरी यांच्या ईमेल आयडीवर लॅपटॉप आणि बॅगेसंबंधी माहिती कळविली. मात्र, ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या दोघांनी जवळच्या संगणक दुकानात जाऊन पासवर्ड उघडून पाहण्याची विनंती केली. मात्र, दुकानदाराने असे करणे योग्य नसल्याचे सांगत नकार दिला. दरम्यान, त्यांच्यामध्ये चौधरी टाटा मोटर्समध्ये काम करीत असल्याबाबत चर्चा झाली.
योगायोगाने या दुकानदाराचा एक मित्र टाटा मोटर्समध्ये काम करीत होता. त्याच्याशी संपर्क साधून सर्व माहिती देण्यात आली. या मित्राने चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांची बॅग सापडल्याची माहिती दिली.
चौधरी यांनी सोमवारी संध्याकाळी गजानन आणि खंदारे यांची भेट घेतली. या दोघांनी त्यांची बॅग आणि लॅपटॉप त्यांना परत केला. खंदारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळले होते.