प्रत्येक तहसील कार्यालयातही नोंदवता येणार हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:30+5:302021-08-21T04:14:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यावर आता ग्रामीण भागातही हरकती नोंदवता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यावर आता ग्रामीण भागातही हरकती नोंदवता येणार आहेत. यासाठी मुख्यत: चार विभागीय केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच येत्या सोमवारपासून प्रदेश क्षेत्राच्या हद्दीतील प्रत्येक तहसील कार्यालयातही नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येतील, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.
औंध कार्यालयात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने यापूर्वीच आकुर्डी, वाघोली, नसरापूर, वडगाव मावळ याठिकाणी केंद्र सुरू केलेले आहेत. त्या-त्या भागातील नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी मुख्यत: ही केंद्र सुरू केली आहेत. आपआपल्या गट नंबरवर आरक्षण पडले असेल तर त्याचे नकाशे प्रत्यक्ष पाहणे तसेच समजून सांगण्यासाठी पीएमआरडीएने कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.
----
पीएमआरडीएच्या औंध कार्यालयात सध्या हरकती, सूचना नाेंदवण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही औंध कार्यालय दळणवळणाच्या दृष्टीने खर्चिक पडत होते. चार विभागीय केंद्र सुरू केले आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात हरकती नोंदवण्यासाठी दोन दिवसांत त्याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष तहसील कार्यालयात पीएमआरडीएचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए
-----
सोमवारपासून नकाशे डाऊनलोड करता येणार
प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे नागरिकांना मिळणार आहेत. येत्या सोमवारपासून पीएमआरडीएच्या www.pmrda.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत.
तसेच ज्या नागरिकांना हरकती, सूचना प्रत्यक्ष कार्यालयात येऊन देता येणार नाही, अशा नागरिकांना pmr.dp.planning@gmail.com हा मेल आयडी देण्यात आला आहे.
----
...या विभागीय केंद्रावर नोंदवता येणार हरकती
* औंध येथील पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय
* आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालय
* वाघोली क्षेत्रीय कार्यालय (ग्रामपंचायत कार्यालयामागे)
* नसरापूर क्षेत्रीय कार्यालय (तलाठी कार्यालयाशेजारी)
* वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय (जुनी पंचायत समिती इमारत)