वेध विलिनीकरणाचे बावधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:01+5:302021-04-03T04:11:01+5:30
बावधन बुद्रुकमधील सर्वसामान्य नागरिक धास्तावले दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बावधन बुद्रुकमधील सर्वसामान्य नागरिकांना विलिनीकरणानंतर वाढीव कर ...
बावधन बुद्रुकमधील सर्वसामान्य नागरिक धास्तावले
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बावधन बुद्रुकमधील सर्वसामान्य नागरिकांना विलिनीकरणानंतर वाढीव कर आकारणीची चिंता सतावत आहे. करवाढ निदान टप्प्याटप्प्याने लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे.
बावधनमधील बरीच लोकसंख्या ही गरीब, कामगार आणि लघु उद्योगावर आधारलेली आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाला तर महापालिका आमच्याकडून वेगवेगळ्या स्वरुपात मोठा कर वसूल करेल. आम्हाला स्वतःच्या घरबांधणीसाठी महानगरपालिकेत चकरा माराव्या लागतील, त्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी, असे नमूद करत काहींनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
येथील काही भागात पीएमपीची बस येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. जवळपास सहाशे मीटर ते एक किलोमीटरची पायपीट केल्यानंतर बसस्थानक बावधनकरांना गाठावे लागते. बांदल इस्टेट परिसरातील नागरिकांनी ही समस्या मांडली. बावधन गावाशेजारुन जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला सर्विस रोडवर कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. त्यावर भटक्या जनावरांचा वावर असल्याने कचरा समस्येबरोबर भटक्या जनावरांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चेलाराम रुग्णालय रस्त्यावरही कचरा असल्याने परिसरात अनारोग्याची भीती आहे.
बावधनमध्ये भूमिगत सांडपाणी विल्हेवाटाची व्यवस्था असली तरीही कचरा व्यवस्थापन चांगले झालेले नाही. सगळीकडे रस्त्यावर कचरा असतो. ग्रामपंचायतीकडे कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. महापालिका या त्रुटी दूर करणार असेल तर आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो असे बावधनकरांनी सांगितले.
कोट
बावधनमध्ये अजूनही वेळोवेळी पाण्याची भीषण टंचाई भासते. पायाभूत सुविधांसाठी महापालिकेत गावाचा समावेश करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
-अनिल चव्हाण
कोट
तरुणांना ओपन जीम तसेच अद्ययावत सुविधांसह सुसज्ज मैदान हवे. त्यासंदर्भात प्रयत्न होणार असतील तर आम्ही या निर्णयाचे स्वागत करु.
-सचिन जाधव, महाविद्यालयीन विद्यार्थी
फोटो ओळ
बावधन बुद्रुक येथे टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत.