विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:27+5:302021-03-05T04:10:27+5:30

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी ...

Observing Merger: Narhe Part 2 | विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

Next

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नऱ्हेमधील ʻअभिनवʼ संकुल परिसर हा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते आणि ड्रेनेज आमच्याकडे कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

येथील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अतिक्रमण वाढत असल्याने रहादारीस अडचण निर्माण होत आहे.

अभिनव परिसर हा गावातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि सांडपाणी या बाबतींत अजूनही फारशी कामे झालेली नाहीत. याच परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या वेगाने अतिक्रमण वाढत असून, आता नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावठाण परिसरात ड्रेनेजचे ८०% काम झाले असून याबाबत अभिनव परिसर पूर्णतः दुर्लक्षित राहिला आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नसल्याने सांडपाणी उघड्यावरच सोडले जात आहे. वीजखांबांवर सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने सुरक्षेची चिंता नागरिकांना नाही? मात्र रस्त्यांवर रात्री दिवाबत्तीची सोय कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती गावकऱ्यांना नाही.

गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे. ओढे आणि नाल्यांवर तर मोठे अतिक्रमण झालेले असून तेथेही बेकायदा बांधकामांना वेग आला आहे.

स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाच्या किनाऱ्यावर कचरा साचलेला त्यापेक्षा अधिक कचरा आणि घाण सांडपाणी हे पुलाशेजारील नाल्यात वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलवाहिनीतून होतो. पण त्यासाठीची वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीकडे नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पाला जागा नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टाकी गावात असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते.

गावाला मल्लनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मोठी पंचाईत झाली आहे. महापालिकेत आमचा समावेश होणार असेल तर आमच्या गावाला या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. गावात विरंगुळा केंद्र व तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. विलिनीकरणानंतर महापालिकेकडून या गोष्टींची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे.

-सर्वेश मेहता, व्यावसायिक

-----

गावाला १४ व्या वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळणार आहे. मात्र, विलिनीकरणामुळे नुकसान होईल. याआधी विलीन झालेल्या अकरा गावांचा विकास महापालिकेला का करता आला नाही?

- अशोक खराडे, ग्रामस्थ

Web Title: Observing Merger: Narhe Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.