House Lifting In Pune: पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:49 PM2024-12-02T13:49:02+5:302024-12-02T13:50:08+5:30
२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार
निमगाव केतकी (इंदापूर) : पालखी महामार्गाला अडसर बनत असलेली ३६०० स्क्वेअर फुट ची इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्या स्थितीमध्ये असलेल्या जागेवरून ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्याचा प्रयोग निमगाव केतकी येथील येथील संजय म्हेत्रे करत आहेत.
२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार असून हे काम हरियाणा मधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आलेले आहे. ही तीन मजली असलेली इमारत दुसऱ्या जागेवरती नेण्याकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. तसेच ही इमारत हलवताना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे व इतर सर्व व्यवहाराचे संबंधित ठेकेदाराने स्टॅम्प पेपर वरती ऍपिडेट करून दिलेले आहे.
सदरची बिल्डिंग जॅकच्या साहाय्याने चार फूट उंच उचलून जागेवरून हलवण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांमध्ये तीस फूट हलवण्यात आली असून हे आश्चर्य पाहण्यासाठी गावातील नागरिक गर्दी करत आहेत. ही इमारत मूळ जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी ५० कामगार कार्यरत असून २५० जॅकच्या साहाय्याने इमारत सरकवत आहेत. ही इमारत उचलण्यासाठी स्क्वेअर फुटाला दोनशे रुपये व पुढे सरकवण्यासाठी पाचशे रुपये खर्च असून ही इमारत सरकवण्याचा प्रयोग येथील नागरिकांचा कुतूहलाचा विषय ठरला आहे.