वित्तीय समितीचा अडसर दूर, नगरसेवकांची ‘स’ यादीतील कामे लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:12+5:302021-06-23T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात महापालिकेचे उत्पन्न कमी झाल्याने, नगरसेवकांच्या ‘स’ यादीला कात्री लावणाऱ्या वित्तीय समितीचा अडसर आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात महापालिकेचे उत्पन्न कमी झाल्याने, नगरसेवकांच्या ‘स’ यादीला कात्री लावणाऱ्या वित्तीय समितीचा अडसर आता दूर झाला आहे. यामुळे नगरसेवकांना ‘स’ यादीच्या ३० टक्के निधी आपापल्या वार्डातील कामांवर खर्च करता येणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेल्या कामांपैकी त्यांच्याकडून कामांचा प्राधान्यक्रम ठरवून घेऊन, याच आठवड्यात संबंधित कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रशासनाला दिले.
‘स’ यादीतील ३० टक्के निधी हा सर्वच नगरसेवकांना आपल्या वार्डातील विकासकामे करण्यासाठी खर्ची करण्यास मान्यता देण्यात आली असून, यातून साधारणतः साडेतीनशे कोटी रुपयांची कामे होणार असल्याची माहिती रासने यांनी दिली.
नगरसेवकांनी ‘स’ यादीत सुचविलेल्या वार्डस्तरीय कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून, उपलब्ध करून दिलेला ३० टक्के निधी वापरासाठीची यादी महापालिकेच्या झोनल कार्यालयात द्यावी. तर या कामाच्या निविदा प्रक्रिया याच आठवड्यात काढून ही कामे सुरू करावीत अशा सूचनाही प्रशासनास दिल्या असल्याचे रासने यांनी सांगितले.
-------
चौकट :-
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी, महापालिकेचे उत्पन्न घटल्याने पैशाचा अनावश्यक वापर टाळावा, याकरिता कामांची छाननी करण्यासाठी वित्तीय समितीची स्थापना केली होती. मात्र, या समितीने नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील सर्वच निधीला कात्री लावली होती. परिणामी, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह सर्वच नगरसेवकांच्या रोषाला प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते. आज स्थायी समितीच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीकडेही यामुळे पाठ फिरवल्याची चर्चा महापालिकेत होती. दरम्यान, स्थायी समितीच्या कोणत्याच सदस्याने या कारणास्तव बैठकीला अनुपस्थिती दर्शवली नसून, ही केवळ अफवा होती. असे समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले आहे.