विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:40+5:302021-05-17T04:09:40+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा घेण्याबाबत नियमावली प्रसिद्ध केली असली, तरी काही अभ्यास ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा घेण्याबाबत नियमावली प्रसिद्ध केली असली, तरी काही अभ्यास मंडळांनी अद्याप ऑनलाइन प्रात्यक्षिक घेण्याबाबतचे व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे विद्यापीठाने काही अभ्यास मंडळांवर अध्यक्षांची नियुक्तीच केलेली नाही. तसेच, ठराविकच प्रॅक्टिकल घेण्याबाबत विद्यापीठाने सूचना दिल्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत अडचणी येऊ शकतात, असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांनी विज्ञान व इतर विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा येत्या १५ जूनपर्यंत घ्याव्यात, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून दिले आहेत. त्यात अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात महाविद्यालये सुरू होती. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेणे शक्य झाले. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील ५५ ते ६० टक्के महाविद्यालयांनी प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या आहेत. परंत, पुण्यातील बहुतांश सर्व महाविद्यालयांना प्रॅक्टिकल परीक्षा घेणे शक्य झाले नाही.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत बोलावून त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना विद्यापीठातर्फे दिले. त्याचप्रमाणे काही विषयांचा अभ्यास मंडळांनी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी काही व्हिडिओ तयार केले. सर्वच अभ्यास मंडळाने यांनी याबाबत व्हिडिओ तयार करणे अपेक्षित होते. मात्र, दोनवेळा पाठपुरावा करूनही विद्यापीठाला अद्याप काही अभ्यास मंडळांकडून व्हिडिओ प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अभ्यास मंडळातील सदस्य प्रात्यक्षिक परीक्षाबाबत गंभीर आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.
विद्यापीठाने ठराविक विषयांवरील प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना दिल्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तसेच, काही महाविद्यालयांकडून केवळ दोन प्रात्यक्षिक परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण दिले जात असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे कमीत कमी ५० टक्के प्रॅक्टिकल्स घेणे अपेक्षित आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
--
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन २५ जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाला पाठवावेत. विद्यापीठाने काही ठराविक प्रॅक्टिकल घेण्याबाबत सुचवले असले, तरी महाविद्यालयांना इतर प्रॅक्टिकल्स घेण्याची मुभा आहे.
- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, विद्याशाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
अध्यक्षच नाही; मंडळाचे कामकाज कसे करावे?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व मायक्रोबायोलॉजी या दोन विषयांच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे अध्यक्ष नसलेल्या अभ्यास मंडळाचे कामकाज कसे करावे, असा प्रश्न संबंधित अभ्यास मंडळाच्या सदस्यांना पडला आहे.