शासकीय कामात अडथळा; विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:15 AM2019-01-10T01:15:59+5:302019-01-10T01:16:07+5:30

अधिकाऱ्याला दमदाटी : माळेगाव कारखाना वजनकाटे तपासणी प्रकरण

Obstruct government work; Offense of Opposition Leader | शासकीय कामात अडथळा; विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा

शासकीय कामात अडथळा; विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा

googlenewsNext

बारामती : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत बारामती विभागाचे वैधमापनशास्त्र निरीक्षक योगेश आगरवाल यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने काटा पडताळणी व मुद्रांक करण्यासाठी आॅनलाईन पध्दतीने सुरूवातीला २५ हजार रूपये भरले.

पुन्हा त्यांनी दि.११ डिसेंबर २०१८रोजी २०,३०० रूपये आॅनलाईनने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे बारामती येथे भरले.त्यामुळे आगरवाल काटा पडताळणी व मुद्रांक करण्यासाठी माळेगाव कारखान्यात गेले. तेथे १० टनाचे २ वेब्रिज यांच्यामध्ये शासनाने विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त त्रुटी आढळल्याने अनुसूची १० नुसार सात दिवसात वेब्रिज पुन्हा पडताळणीसाठी सादर करण्याच्या अटीवर माळेगाव साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सदर वेब्रीज माळेगाव कारखान्याच्या ताब्यात देण्यात आली. त्या अनुषंगाने दि ७ जानेवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सस्ते यांनी वैधमापन निरीक्षक आगरवाल यांना फोन करून तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले.

आगरवाल यांनी सस्ते यांना दि. ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भेटण्यास बोलावले. मात्र, सस्ते एका कार्यक्रमात असल्याने दुपारी २ च्या सुमारास आगरवाल यांना भेटण्यासाठी बारामती येथील कार्यालयात नेहरु टोपी,कुरता पायजमा घातलेल्या अनोळखी इसमासह आले. सस्ते यांनी आगरवाल यांना तुम्ही माळेगाव कारखान्यावर केलेल्या कारवाईची लाज वाटते का,असा सवाल केला. सस्ते यांच्यासोबत आलेल्या इसमाने आगरवाल यांना तुम्ही थोडा कारखान्याचा विचार करायचा होता,असे विधान केले. यानंतर सस्ते यांनी तुम्ही कारखान्यात गेलाच का? तुम्ही काय कारवाई केली, असा प्रतिप्रश्न करून थोडे थांबून आम्ही काय तुमचे प्रवचन ऐकण्यास आलो नाही, असे आगरवाल यांना उद्देशुन म्हणाले. त्यावेळी आगरवाल यांनी सस्ते यांना माझे म्हणणे तुम्हाला प्रवचन वाटत असेल तर तुम्ही लेखी विचारा,असे सांगितले. त्यावेळी आगरवाल त्यांच्या जागेवरून उठत असताना सस्ते यांच्यासोबतच्या इसमाने कोठे चालला तू, असे आगरवाल यांना बजावून त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यावर आगरवाल हात सोडवुन उठत असताना त्या अनोळखी इसमाने खांदा धरुन तू बस खाली, असे आगरवाल यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा हात पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यांच्या पकडीतुन निघाल्यानंतर तु जागेवर बस तु कोठे चालला, असे म्हणुन आरेतुरे भाषेचा प्रयोग केला.

दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
सस्ते यांच्यासह अनोळखी इसमाने दमदाटी करून माळेगाव कारखान्यावर केलेल्या कायदेशीर कारवाईवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.माझ्या जीविताला धोका असल्याचे आगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या फिर्यादीवरून सस्ते यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या अनोळखी इसमाविरूध्द बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

Web Title: Obstruct government work; Offense of Opposition Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.