सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 08:11 PM2023-11-27T20:11:36+5:302023-11-27T20:17:29+5:30

प्रशिक्षण देताना संस्थेचे पहिले विमान १९ आॅक्टोबर रोजी तर दुसरे विमान २२ आॅक्टोबर रोजी कोसळले होते

Obstructing government work is costly A case has been filed against 9 persons of Red Bird Pilot Training Institute | सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल

बारामती : बारामती एमआयडिसी तील  रेड बर्ड फ्लाईंग अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या विमानअपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांना  सहकार्य न करता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेच्या ९  अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विमानअपघात तपास ब्युरो दिल्लीचे सहाय्यक संचालक आनंदन पोण्णूसामी यांनी फिर्याद दिली आहे. दि. २३ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दि. २६ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्यादीनुसार रेड बर्ड संस्थेच्या करण माने, शक्ती सिंग, हर्ष दागर, रेशम चौधरी, अजुष शर्मा, मृणय रिझवी, राकेश सिंग, मार्क डिसोझा, गणेश जगताप (पूर्ण नावे नाहीत) यांच्या विरोधात भादंवि कलम ३५३, १८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    
बारामती एमआयडीसीतील कटफळ हद्दीत ही कंपनी कार्यरत आहे. मागील महिन्यात या संस्थेचे पहिले विमान १९ आॅक्टोबर रोजी तर दुसरे विमान २२ आॅक्टोबर रोजी कोसळले होते. या घटनेनंतर संस्थेचा विमान उड्डाण परवाना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने निलंबित केला होता. सातत्याने गंभीर अपघात घडत असल्याने विमान अपघात तपास संस्थेकडून याची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यानुसार पोण्णूसामी व त्यांचे सहकारी कणीमोझी वेंधन हे दोघेही दि. २३ रोजी बारामतीत दाखल झाले. दि. २५ पर्यंत ही चौकशी सुरु राहिली. परंतु यावेळी संस्थेकडून तपासकामी कोणतेही सहकार्य झाले नाही. उलट अडथळा आणण्याचाच प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले  आहे. 

Web Title: Obstructing government work is costly A case has been filed against 9 persons of Red Bird Pilot Training Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.