पाकिस्तान, अफगाणिस्तानचा सुकामेवा ईद निमित्त बारामतीच्या बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:17 PM2019-06-04T13:17:39+5:302019-06-04T13:23:51+5:30
रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो.
बारामती : रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो. त्यामुळे बाजारात सध्या अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी देशांतून सुकामेवा बाजारात उपलब्ध झाला आहे, तर ईदच्या सणासाठी पाकिस्तानमधून आलेली खारीक बाजारात उपलब्ध आहे. मात्र, भारत-पाकिस्तानच्या तणावपूर्ण संबंधांचा खारकेच्या दरावर मोठा परिणाम झालेला पाहावयास मिळत आहे.
पाकिस्तानातून आयात होणाऱ्या खारकेवर ३०० टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे खारकेच्या प्रतिकिलो दरात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने असणारी खारीक यंदा २२० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. याशिवाय अमेरिकेतून बदाम, कर्नाटक, गोव्यातून काजू, अफगाणिस्तानमधून चारोळे, पिस्ता, केरळची विलायची बाजारात उपलब्ध आहे. काश्मीरमधून केशर उपलब्ध आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. यात मुस्लिम बांधव एक महिन्याचे उपवास करून रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा करतात. ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो, ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे, शिरखुर्मा बनवण्याचा उद्देश म्हणजे या दिवशी नातेवाईक मित्रमंडळी यांना ईदच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाचे तोंड गोड केले जाते. शिरखुर्मा बनवण्यासाठी आवश्यक साहित्याची दुकाने बारामती शहरातील बाजारपेठेत थाटली आहेत. काजू, बदाम, पिस्ता, चारोळे, बेदाणे, खसखस, इलायची, खारीक, खोबरे, शेवई, बडीशेप, केशर या सुकामेव्याचा शिरखुर्मा बनवण्यासाठी वापर केला जातो.
..............
सुकामेव्याच्या किमतीमध्ये मागील वर्षापेक्षा यंदा तीस टक्के वाढ झाली आहे. खारकेचे मोठे उत्पादन पाकिस्तानमध्ये होते. कर लावल्याने किमतीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय शिरखुर्मा बनवण्यासाठी शेवई महत्त्वाचा पदार्थ आहे. शेवईमध्ये लखनऊ, लच्छ, गणेश शेवई, साधी शेवई हे शेवइचे प्रकार विक्रीस आहेत. काजू, बदाम यांच्या आकारावर दर ठरतो. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे.
असिफ शेख - सुकामेवा व्यापारी