‘नृत्यभारती’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्मृतिगंध’ दरवळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:37+5:302021-07-08T04:09:37+5:30
पुणे : जगविख्यात नृत्यांगना पंडिता रोहिणीताई भाटे यांनी स्थापन केलेल्या ‘नृत्यभारती’ कथक डान्स अॅकॅडमी ही संस्था यंदा ...
पुणे : जगविख्यात नृत्यांगना पंडिता रोहिणीताई भाटे यांनी स्थापन केलेल्या ‘नृत्यभारती’ कथक डान्स अॅकॅडमी ही संस्था यंदा ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेणे शक्य नसले तरी, संस्थेने 'स्मृतिगंध 'हा व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित केला आहे.
येत्या शनिवारी (दि.१०) सायंकाळी ७ ते ८.१५ या वेळेत ' नृत्यभारती कथक ' या फेसबूक पेजच्या माध्यमातून हा अमृतमहोत्सवी सोहळा रसिक प्रेक्षकांना पाहता येईल. रोहिणीताईंचे स्वत:चे नृत्य तसेच त्यांच्या काही अतुलनीय नृत्यरचनांचे संक्षिप्त दर्शन या माध्यमातून रसिकांना घडेल. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचा पुन:प्रत्यय यातून रसिकांना नव्याने अनुभवता येईल.
'नृत्यभारती' म्हणजे पुण्यातील कथकचे आणि गुरु-शिष्यांचे परस्परबंध जपणारे सुवर्णपान. ज्या काळी स्त्रियांनी नृत्य करणे हे अमान्य होते, अशा काळात विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जगविख्यात कथक नृत्यांगना पंडिता रोहिणीताई भाटे यांनी नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमी सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले. इतकेच नव्हे नृत्य हे शिक्षणाचे अंग बनवण्यापर्यंत त्यांनी संस्थेची वाटचाल नेली. आज नृत्यभारतीच्या शिष्या हीच परंपरा पुढे नेत आहेत. गुरूंकडून आत्मसात केलेल्या शैलीसह बदलत्या काळाप्रमाणे त्यास नवतेची व सृजनशीलतेची जोड देत या शिष्या आज नृत्यभारतीचा वारसा अभिमानाने जपत आहेत.
गुरू पं. रोहिणीताईंचे विचार, नृत्य व रचनांचे अवलोकन घरबसल्या रसिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी वर्षभर व्हर्च्युअल कार्यक्रम घेण्याचा देखील संस्थेचा मानस आहे. तरी, संपूर्ण पुणेकरांसाठी अभिमान ठरणाऱ्या ‘स्मृतिगंध’ या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.