नववर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेल रडारवर
By admin | Published: December 30, 2016 04:50 AM2016-12-30T04:50:43+5:302016-12-30T04:50:43+5:30
गतवर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना शहरातील सर्व प्रकारची हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने तसेच बिअरबार यांची तपासणी
पुणे : गतवर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना शहरातील सर्व प्रकारची हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने तसेच बिअरबार यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा व इतर नियमांची अंमलबजावणी याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहरात जवळपास पंचतारांकित २० ते ३० बडी हॉटेल्स आहेत. त्याशिवाय लहान आणि मध्यम स्वरूपाची १० ते १५ हजार एवढी हॉटेल, बिअरबार, परमिट रूम, रेस्टॉरंट शहरात आणि शहराच्या आसपास आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू असताना नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही कारवाई करत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
छोट्या-मोठ्या हॉटेल्सबरोबर शहरातील विविध भागांतील, चौकातील आणि चौपाटीवर असलेल्या चायनीज, चाट, अंडा भुर्जीसह अन्य खाद्यपदार्थांचे गाडेही तपासले जात आहेत. यामध्ये अन्नपदार्थांचा ताजेपणा, त्यांचा दर्जा यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय किचनची स्वच्छता, खाद्यपदार्थांचा कच्चा माल साठवून ठेवण्याची जागा, याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पाळली जाणारी स्वच्छता यांची तपासणी केली जात आहे. या विशेष मोहिमेसाठी एफडीएच्या अन्न विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम यांची तपासणी करण्यासाठी एफडीएने सात विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
ज्या हॉटेल अथवा परमिट रूममध्ये शंकास्पद गोष्टी आढळतील त्या खाद्यपदार्थांसह दारूचे नमुने ताब्यात घेतले जाणार आहेत. हे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील, त्यानंतर अहवाल आल्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवून कारवाई केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मद्यपानाचा परवाना घेणाऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातर्फे गुरुवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरमध्ये विदेशी मद्यसेवन करणाऱ्यांपैकी २४ हजार जणांनी परवाने घेतले होते. देशी दारू पिणाऱ्यांपैकी ३१ हजार ५०० जणांनी परवाने घेतले होते. त्यासाठी आकारलेल्या शुल्कामधून १ लाख १० हजार रुपये आणि विदेशी मद्यासाठी असलेल्या परवान्यापोटी ७५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
यंदा परवाने घेण्याचे प्रमाण विदेशी मद्याबाबत ५२ हजार आणि देशी दारूबाबत २ लाख असे आहे. उत्पादन शुल्क विभागास या माध्यमातून विदेशी मद्यप्रेमींकडून २ लाख ६० हजार रुपये तर देशी मद्यप्राशन करणाऱ्यांकडून ४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या कायद्यानुसार मद्यप्राशनासाठी परवाना बाळगणे आवश्यक असते. देशी दारूचा परवाना २ रुपयांना तर विदेशी मद्याचा परवाना १ रुपयाला मिळतो. वर्षभरासाठीही हा परवाना घेता येतो. तर हयातभर मद्यपानाचा परवाना १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतर उपलब्ध केला जातो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशिष्ट बार, परमिटरूम, देशी दारूच्या दुकानांमध्ये हे परवाने उपलब्ध केले आहेत.
परवाना नसल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकरवी कारवाई केली जाते. परवाना नसल्यास विशिष्ट दंड आकारला जातो. विनापरवाना मद्यपान केल्यास किंवा जवळ बाळगल्यास मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची कारवाई होऊ शकते.
मद्याच्या नशेत वाहने चालविल्याने वाहनचालकांकडून होणारे अपघात, किंवा त्यांना स्वत:ला अपघात होऊन ओढावणारे प्रसंग, वर्षअखेरीस सार्वजनिक ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त, उत्पादन शुल्क विभागाने परवाना नसल्यास कारवाई करण्याचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर यंदा ३१ डिसेंबरसाठी घेतल्या जाणाऱ्या परवान्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.