मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:16+5:302021-09-16T04:15:16+5:30
केडगाव : दौंड तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांमध्ये मेळावे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा ...
केडगाव : दौंड तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांमध्ये मेळावे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा बिगुल फुंकले आहे. तालुक्यातील पारगाव, खामगाव, वरवंड,पाटस व लिंगाळी या गावांमध्ये पदाधिकारी मेळावा घेत आघाडी घेतली आहे. या मेळाव्यामध्ये सर्वाधिक गर्दी लिंगाळी येथील मेळाव्याला झाली होती. राष्ट्रवादीच्या वतीने मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, रमेश थोरात, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे आदी उपस्थिती लावत आहेत.
तुलनेने भाजपा अद्याप शांत असून तालुक्याचे आमदार राहुल कुल हे भीमा पाटस कारखान्याच्या कामासाठी मुंबई,दिल्ली दौरा, कोविड परिस्थिती, निवासस्थानी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, कार्यकर्त्यांचे खासगी कार्यक्रम यामध्ये गर्क आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन मेळाव्याला उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. तुलनेने नवखे असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर हे सध्या युवक कार्यकर्त्यांना प्रवेश देत आपली चुणूक दाखवत आहेत. चौफुला येथील मध्यवर्ती कार्यालयात पासलकर वैयक्तिक कामे करत आहेत. तालुक्यातील
आमदारपद, भीमा पाटस, दौंड नगरपरिषद आदी सत्ताकेंद्रे भाजपाच्या तर जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी संस्थांवर राष्ट्रवादीचे नियंत्रण आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने २ वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीतील अद्यापही कार्यकर्ते विसरले नसल्याचे दिसून येते. कार्यकर्ते व्यासपीठावर बोलायची संधी दिल्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोरच काही राष्ट्रवादी पदाधिकारी भाजपाला कशी मदत करत आहेत याचा पाढा वाचत आहेत. खामगाव, पारगाव व पाटस या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी विरोधात थेट वरिष्ठांसमोरच तक्रार केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या भाषणांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे मेळाव्याच्या निमित्ताने प्रचारात आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एक मात्र खरे की कोविड परिस्थितीमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे गाव यवत येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करत राष्ट्रवादीने यवत परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे.