October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले
By श्रीकिशन काळे | Published: September 20, 2024 03:15 PM2024-09-20T15:15:40+5:302024-09-20T15:15:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले
पुणे : गेल्या आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यामुळे ऐन सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव पुणेकरांना येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. पारा दोन-तीन अंशाने वर चढल्याने उकाड्यात वाढ होऊन नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारांनी नागरिक ओलेचिंब होत आहेत. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले आहे.
खरंतर सप्टेंबर महिन्यात सर्वत्र पाऊस असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला हलका ते मध्यम पाऊस झाला. पण त्यानंतर पाऊस गायबच झाला आहे. या महिन्यात नेहमी पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झालेला असतो. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने पुण्यात कडक उन्ह जाणवत आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने अनेक जणांना विविध आजार जडत आहेत. सरकारी तसेच खासगी रुग्णलयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या एल निनो सक्रिय आहे. त्याचा हा परिणाम आहे. पॅसिफिक महासागराचे तापमान वाढले, तर वारे त्या महासागराकडे वळते. म्हणून आपल्या परिसरात पाऊस पडत नाही. पाऊस पडण्यासाठी वारे समुद्राकडून जमिनीकडे येणे अपेक्षित असते. सध्या उलट झालेले आहे.
या आठवड्यापासून पुढे पावसाची शक्यता नाही. परतीचा पाऊस हा सायंकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. परंतु, तो अधिक नसेल. विजांचा कडकडाट अधिक होऊ शकतात. ऑगस्टपासून ला निनो सक्रिय आहे. हिवाळ्यातही तो सक्रिय असेल. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ
पुण्यातील किमान व कमाल तापमान
दि. १६ सप्टेंबर : १८.७ : २८.०
दि. १७ सप्टेंबर : १९.३ : २८.०
दि. १८ सप्टेंबर : १८.८ : ३१.०
दि.१९ सप्टेंबर : २०.३ : ३०.५
दि. २० सप्टेंबर : २०.१ : ३१.०
पाऊस कधी परतणार!
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनूसार २६ सप्टेंबरपासून पुढील १०-१२ दिवस मध्य भारतामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील हा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.