October Heat: 'ऑक्टोबर हिट'पासून स्वतःचा बचाव कसा कराल? 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:55 PM2023-10-17T14:55:04+5:302023-10-17T14:55:52+5:30
सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण दिसत आहेत. सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण घरोघर आढळत आहेत. तसेच डेंग्यू चिकुनगुनिया या सुद्धा व्हायरल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत....
पिंपळे गुरव : सध्या ऋतुसंधीचा काळ सुरू आहे. ऋतु संधी म्हणजे एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होण्याच्या मधला काळ. पावसाळा संपला आणि आता थोड्याच दिवसात हिवाळा सुरू होईल, असा हा मधला ऋतु संधीचा काळ अनेक व्हायरल आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण दिसत आहेत. सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण घरोघर आढळत आहेत. तसेच डेंग्यू चिकुनगुनिया या सुद्धा व्हायरल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उन्हामुळे फिरते विक्रेते आणि कामानिमित्त दुचाकीवर बाहेर जास्त फिरणारे चाकरमान्यांना उष्माघाताचा सुद्धा त्रास होताना दिसत आहे. डोकेदुखी, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे ही दिसतात. याबरोबरच पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांना नाकाचा घोळणा फुटणे यासारखी लक्षणे दिसतात. वाढत्या उन्हामुळे आणि त्यामुळे हवेत वाढलेल्या धुळीमुळे ज्यांना जास्ती बाहेर फिरावे लागते. त्यांच्या त्वचेवर सुद्धा उन्हामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विपरित परिणाम होत आहे.
काय काळजी घ्यावी
डिहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसातून कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी पोटात जाईल याची काळजी घ्यावी. उन्हामुळे अंगातील क्षार पण बाहेर पडतात आणि हाता पायामध्ये गोळे येण्याची, थकवा उत्पन्न होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यामुळे नारळ पाणी, कोकम सरबत ,लिंबू सरबत यांचे प्राशन सुद्धा करावे. दुपारी ११ ते ३ यादरम्यानच्या उन्हात फिरणे टाळावे. अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून उघड्या त्वचेचा बचाव करण्यासाठी एसपीएफ ३० पेक्षा जास्त पॉवर असणाऱ्या सनस्क्रीन लोशनचा वापर अवश्य करावा.
सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच वाफ घेणे आणि गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे हा पारंपरिक उपाय करावा. डोळ्याची आग होत असल्यास रात्री झोपताना डोळ्यावरती थंड गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. या काळात उलट्या जुलाबाचे रुग्ण पण वाढतात त्यामुळे जास्त तिखट किंवा उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाणे टाळावे . सौम्य व हलका आहार घ्यावा तसेच रसाळ फळे खावीत.